आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममध्ये खडखडाट; नागरिकांचे झाले हाल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - राष्ट्रीयीकृत बॅँक कर्मचार्‍यांच्या संपाच्या दुसर्‍या दिवशी बहुतांश बॅँकांच्या एटीएममधील पैसे संपल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, खासगी बॅँकांमध्येही तुरळक प्रमाणातच व्यवहार झाल्याची माहिती बॅँक व्यवस्थापकांकडून देण्यात आली. दुसर्‍या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला.


वेतन कराराची मुदत संपूनही व्यवस्थापनाकडून त्याबाबत कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या 13 संघटनांची मध्यवर्ती संस्था युनायटेड एम्प्लॉइज फोरमतर्फे सोमवार व मंगळवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. मंगळवारीही बॅँकांचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. संपकाळात दोन्ही दिवस मिळून एकूण 250 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार जिल्ह्यात ठप्प झाले. त्याचा फटका सर्वसामान्य खातेदारांसह शासकीय कार्यालय, व्यापार, उद्योग क्षेत्राला बसला. अनेकांना या दोन दिवसांत बॅँकिंग व्यवहार करता न आल्याने त्यांच्या कारभारात अडचणी निर्माण झाल्या.


या संपात एचडीएफसी, आयसीआयसीआय, अँक्सेस या खासगी बॅँकांसह सहकारी बॅँका सहभागी झाल्या नव्हत्या. त्यांचे व्यवहार नियमित सुरू होते ; परंतु धनादेश आणि आंतरबॅँक व्यवहार बंद असल्याने या बॅँकेत केवळ खात्यातून पैसे काढणे, भरणे आणि इतर नियमित कामकाज झाले. अन्य कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नाही. अँक्सेस बॅँकेतही या दोन दिवसांत व्यापार्‍यांकडून एलबीटी कराचा भरणा मोजकाच केला गेला.


बेरोजगारांना झाली अडचण
लोकसेवा, एसटी महामंडळ आणि इतर शासकीय कार्यालयातील नोकर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी बॅँकेत शुल्क भरावे लागते. त्यात अनेक पदांसाठी अंतिम मुदत ही 10 ते 15 फेब्रुवारीदरम्यान असल्याने संपामुळे उमेदवारांना शुल्क भरता आले नाही. शुल्क भरण्यास उशीर झाल्यास या उमेदवारांची नोकरीची संधी हुकू शकते.


बॅँकेत आज होणार गर्दी
रविवारची सुटी आणि दोन दिवसांच्या संपानंतर उद्या बुधवारी बॅँकांचे कामकाज नियमित सुरू होणार आहे. तसेच गुरुवार (दि.13)पासून शासकीय कर्मचारी, शिक्षकांकडून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे उद्या बुधवारी बॅँकांमध्ये खातेदार, ग्राहकांकडून गर्दी होण्याची शक्यता आहे.