आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाफना ज्वेलर्सकडे खंडणी मागणारा गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बाफना ज्वेलर्स येथे पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून फोनवरून दीड लाखाची खंडणी मागणारा दहिसर येथील हिस्ट्रीशीटर निशांत ऊर्फ बंटी परमार याला रविवारी अटक करण्यात आली. कॉफर्ड मार्केट गुन्हा शाखेच्या पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. निशांतवर मुंबई उपनगरात गंभीर स्वरुपाचे ३२ गुन्हे दाखल अाहेत.

निशांतने १३ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता सुनील कस्तुरचंद बाफना यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून आपण अंबोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक काकडे बोलत असून तुम्ही चोरीचे सोने खरेदी केले आहे. त्यामुळे तुम्हाला अटक केली जाईल, असे सांगून शिवीगाळ केली. नंतर दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निशांतने बाफना यांना फोन लावला तो मोबाइलही चोरीचाच होता. त्या नंबरच्या आधारावर जळगाव पोलिसांनी निशांतचा शोध घेणे सुरू केले होते. तशी माहिती राज्यात इतर ठिकाणीही पाठवली होती. त्यानुसार शनिवारी मुंबईतील कॉफर्ड मार्केट गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जळगावच्या एलसीबीची मदत घेत निशांतला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
मुंबईत ३२ गुन्हे : निशांतवर मुंबईतील विरार, कस्तुरबा, कांदिवली, गोरेगाव, चारकोप, मलाड, समतानगर पोलिस ठाण्यात ३२ गुन्हे दाखल आहेत.
चोरी, घरफोडी, खंडणी, फसवणूक, अपहाराचे गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत. प्रत्येक गुन्ह्यात जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा गुन्हे करण्याकडेच वळतो.

नंबर मिळवण्यासाठी शक्कल

निशांतला बाफना ज्वेलर्स सोन्याचे मोठे शोरूम असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने जळगावच्या नियंत्रण कक्षात फोन करून शनिपेठ पोलिस ठाण्याचा नंबर मिळवला. तेथून शोरूमचा शोरूममधून बाफनांचा मोबाइल नंबर मिळवला.