आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याभरात पाचशे कोटींचे वितरण, बाजारपेठेत अद्यापही चणचण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शासनाने हजार पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यास एक महिना झाला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील विविध बँकांमधून साडेचारशे कोटींचे वाटप झाले आहे. महिना उलटला ; परंतु अद्याप परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. दुसरीकडे महिनाभरानंतरही एटीएममध्ये खडखडाट आहे. ग्रामीण भागात पहाटेपासून बँक एटीएमसमोर रांगा लागत आहेत. ही परिस्थिती ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत.
शासनाने नोव्हेंबरला हजार पाचशेची नोट चलनातून हद्दपार केली. त्यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. निर्णयानंतर आठ दिवसांनी बँकांमध्ये नवीन दोन हजार तर २५ दिवसांनी पाचशेची नोट आली. नोटबंदीच्या निर्णयाला गुरुवारी एक महिना झाला. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बँकांमधून पाचशे कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. सर्वाधिक सेंट्रल बँक स्टेट बँकेतून नवीन नोटांचे वितरण करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँकेसह विविध बँकेच्या एटीएममधून दोन हजार रुपयांची नोट नागरिकांना मिळत आहे. मात्र, महिनाभरानंतर थोड्याफार प्रमाणात परिस्थिती जैसे थेच आहे. अद्यापही उद्योजक, शेतकरी, व्यापारी, लहान व्यावसायिकांना नोटांची टंचाई जाणवत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारही अद्याप सुरळीत झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी-व्यापारी चिंतेत आहेत. बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा असल्याचे चित्र आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर गुरुवारी सकाळपासून शेतकऱ्यांनी
पैशांसाठी रांग लावली होती. हीच परिस्थिती फागणे, कापडणे, मुकटी, सोनगीर, आर्वी, शिरुड येथे आहे. महिनाभरात पाचशे कोटींचे वितरण; बाजारपेठेत अद्यापही चणचण

कॅशलेसवर भर
शासनाने कॅशलेस व्यवहारावर भर दिला आहे. काल बुधवारी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बँकांसह प्रशासकीय यंत्रणेला सर्व व्यवहार हे कॅशलेस करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. यासंदर्भात कर्मचाऱ्यांचे यशदाच्या माध्यमातून प्रशिक्षण गुरुवारी देण्यात आले. या माध्यमातून आता व्यवहार आणखी सुरळीत होणार आहेत.
एटीएममधील खडखडाट
एकीकडे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. दुसरीकडे स्टेट बँक, हस्ती बँकेसह बोटावर मोजण्याएवढ्या बँकांचे एटीएम वगळता इतर बँकांचे एटीएम अद्यापही सुरळीत सुरू झालेले नाही. जिल्ह्यात १५० एटीएम असून, त्यापैकी सद्य:स्थितीत केवळ २० ते २२ एटीएम सुरू आहेत. त्यामुळे बँकांसमोरील रांगा कमी होत नसल्याची स्थिती आहे.
बातम्या आणखी आहेत...