आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : अटक टाळण्यासाठी चोरट्याने केला गळफास घेण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील न्यू भगवाननगरात संशयितरित्या फिरणाऱ्या दोघा चोरट्यांचा पोलिसांनी पाठलाग केला असता ते चोरटे पसार झाले. यापैकी एका चोरट्याने एका घरात शिरून पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून चोरट्यास बाहेर काढले आणि त्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला.
दरम्यान, संशयित चेतन गिरासे रवी सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, चेतन भिकासिंग गिरासे (वय २३, रा.तामखेडा, ता. शिंदखेडा) रवी सुरेश सूर्यवंशी (वय २९, रा.सुप्रीम कॉलनी) हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. शनिवारी त्यांनी पाचोरा येथून सीडी डॉन ही मोटारसायकल चोरून आणली होती. रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ते न्यू भगवाननगरमधील माऊली नावाच्या बंगल्याबाहेर रेकी करीत होते. याचवेळी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अनिल बळीराम फेगडे हे मोटारसायकलीवरून गस्त घालत होते. त्यांना या दोघांचा संशय आल्यामुळे त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी या दोघांना पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी पाचोरा येथून लालचंद चंदवाणी (सिंधी कॉलनी) यांच्या मालकीची मोटारसायकल चोरी केली आहे.

नेमके काय घडले न्यू भगवाननगरात

दोघा चोरट्यांचा संशय आल्यानंतर पोलिस कर्मचारी फेगडे यांनी माऊली बंगल्याजवळून मोटार सायकलीने त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. एक किलोमीटर अंतर पार केल्यानंतर किलबिल शाळेच्या गेटजवळ त्यांनी दोघांना थांबवले. चोरट्यांनी मोटारसायकलीच्या दोन्ही नंबरप्लेटवर चिखल लावला होता. त्यामुळे फेगडेंनी त्यांच्याकडून गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्या वेळी त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्यावर फेगडेंचा संशय पक्का झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात फोन करण्याचा प्रयत्न केला.
तिक्यात रवी चेतन यांनी एकमेकांना इशारा करून पळ काढला. त्यामुळे फेगडे यांनीदेखील त्यांचा पाठलाग सुरू केला. या वेळी त्यांनी ललित भदाणे, हितेश बागुल गोपाल बेलदार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. तोपर्यत चोरटे किलबिल शाळेला संपूर्ण राउंड मारून गल्ली-बोळांमधून अडीच किलोमीटर अंतर कापत पारखनगरात पोहचले होते. तर दुसरीकडे फेगडे यांचे तिघे सहकारी हे देखील मोटारसायकलीने पारखनगरच्या दिशेने येत होते. चोरट्यांनी लपण्यासाठी पारखनगरातील के.सी.बेंडाळे, सुनील फालक यांच्या बंगल्यांच्या कंपाउंडमध्ये उड्या घेऊन पोलिसांची नजर चुकवून ते ए.एम.चौधरी यांच्या कंपाउंडमध्ये पोहोचले. पोलिसही तेथे पोहचले. याठिकाणी रवीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर चेतन हा ए.एम.चौधरी यांच्या घरात घुसला.

चेतन घुसला चौधरी यांच्या घरात

७१ वर्षीय चौधरी हे सेवानिवृत्त एसटी कंडक्टर आहेत. पत्नी लीलाबाई यांच्यासह ते राहतात. रविवारी दुपारी ते पुढच्या खोलीत झोपलेले असताना चेतनने घरात प्रवेश करून थेट स्वयंपाकगृह गाठले. तेथे त्याने दोन्ही दरवाजे बंद करून घेतले. त्यावेळी पोलिस चौधरी दाम्पत्य दरवाजा बाहेरच उभे होते. चेतन पोलिसांना आपण काहीच केलेले नाही, असे ओरडून सांगत होता. याच वेळी त्याने फ्रीजची वायर कापली. त्यानंतर गॅसच्या ओट्यावर खुर्ची ठेऊन गळफास घेण्यासाठी त्याने पंख्याला वायर बांधली. हा प्रकार फेगडे पोलिस हे खिडकीतून पाहत होते. त्यामुळे चेतनला वाचवण्यासाठी पोलिसांनी स्वयंपाकगृहाच्या मागील बाजूचा दरवाजा धक्का देऊन तोडला. चेतन उडी घेणार तोच पोलिस घरात पोहचले आणि त्याला खाली उतरवले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

कारागृहात झाली दोघांची मैत्री

रवी आणि चेतन हे दोघे तीन महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या गुन्ह्यात जळगाव कारागृहात एकत्र आले होते. रवीवर घरफोडी, नकली नोटांची अफरातफर तर चेतनवर रस्तालूट, चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. कारागृहात या दोघांची गट्टी झाली होती. दोन महिन्यांपूर्वी चेतन बाहेर पडला तर रवी एप्रिल रोजीच बाहेर पडला होता. चेतनकडे रवीचा मोबाइल क्रमांक होता. त्यानुसार रवी बाहेर पडताच चेतनने त्याला फोन करून पुन्हा चोरी करण्यासाठी प्रवृत्त केले होते.

गस्तीमुळे सराईत गुन्हेगार जेरबंद

दोघे चोरटे रामानंदनगर परिसरात रेकी करण्याच्या उद्देशाने फिरत होते. फेगडे यांनी त्यांचा उद्देश हेरून हटकल्यामुळे चोरटे पोलिसांच्या हाती लागले. दिवसाच्या गस्तीमुळे सराईत गुन्हेगार ताब्यात आले आहेत. फेगडे यांना हे क्रेडीट जाते. हे दोघे चोरटे दिवसा घरफोडी करण्यात पटाईत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.