आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरात फौजदार परीक्षेच्या उमेदवारांना मनस्ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना रविवारी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली.

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी लेखी परीक्षा रविवारी राज्यभर घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 8 हजार 160 उमेदवार बसले होते. त्यांची बैठक व्यवस्था नगर शहर व उपनगरांतील 22 परीक्षा केंद्रांवर करण्यात आली होती. महसूल व विविध विभागांचे 340 समवेक्षक, 81 पर्यवेक्षक, 81 सहायक पर्यवेक्षक, 81 पाणीवाटप कर्मचारी, उपजिल्हाधिकारी दर्जाचे तीन समन्वय अधिकारी, तसेच एक भरारी पथक परीक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.

सकाळी अकरा ते दुपारी एक अशी परीक्षेची वेळ होती. अर्धा तास आधीच उमेदवारांनी केंद्रावर उपस्थित राहणे अपेक्षित होते. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले उमेदवार केंद्रांवर पोहोचले. एकच क्रमांक असलेले अनेक प्रवेशपत्रधारक असल्याचे स्पष्ट होताच प्रचंड गोंधळ उडाला. सर्वच परीक्षा केंद्रांवर हा प्रकार समोर आला. त्यामुळे उमेदवार व पर्यवेक्षकांनाही चांगलाच मनस्ताप झाला. संतप्त झालेल्या काही उमेदवारांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.

बैठक व्यवस्थेत गोंधळ झाल्याचे समजताच युवा सेनेचे विक्रम राठोड, मनपा शिक्षण मंडळाचे सतीश धाडगे, सतीश काळवाघे आदींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. संतप्त उमेदवारांनी डॉ. जाधव यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला.

गोंधळाचा अहवाल आयोगाला पाठवणार
यापूर्वी लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्या. या वेळीही परीक्षेचे चोख नियोजन केले होते. पण काही उमेदवारांच्या प्रवेशपत्रांबाबत गोंधळ झाला. उमेदवारांना झालेल्या मनस्तापाची कल्पना आहे. दादा पाटील शेळके विद्यालयात 100 उमेदवारांची बैठक व्यवस्था आम्ही केली. मुळात लोकसेवा आयोगाकडूनच गलथानपणा झाला आहे. प्रशासनाच्या वतीने परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबतचा अहवाल आम्ही आयोगाकडे पाठवणार आहोत.
- डॉ. सदानंद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी