आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी’च्या 265 जागांसाठी भरती; सात एप्रिल रोजी पूर्व परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) वर्ग-1 आणि वर्ग-2 गटातील विविध 265 पदांसाठी राज्यातील 35 जिल्हा केंद्रावर 7 एप्रिलला परीक्षा घेण्यात येणार आहे. एकाच वेळी मोठय़ा पदांवर भरती होणार असल्याने पदवीधर तरुणाईची त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून आयोगाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात असल्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सोईस्कर झाली आहे.

अर्ज कसा करावा : या परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 12 फेब्रुवारी 2013 ही अंतिम मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भारतीय स्टेट बँक, क्रेडिट कार्ड, डेबिटकार्ड, नेटबँकिंग, कॅशकार्ड याद्वारे भरता येणार आहे. शुल्क भरल्यावर दोन कार्यालयीन कामकाजाच्या दिवसानंतर आयोगाकडून उमेदवाराच्या मोबाइलवर रक्कम प्राप्त झाल्याचा एसएमएस येईल. तसेच उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये तशी सूचनाही मिळेल. उमेदवारास एसएमएस प्राप्त न झाल्यास उमेदवारांनी ऑनलाइन प्रणालीच्या फीडबॅकद्वारे नोंदणी आयडी, तसेच ट्रांजक्शन आयडी व चलनावरील बँकेत रक्कम भरल्याचा दिनांक पाठवावा. प्रवेश प्रमाणपत्राशिवाय उमेदवारास परीक्षा देता येणार नसल्याने ते प्राप्त करणे आवश्यक आहे. चलनाद्वारे प्रवेशशुल्क 13 फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहे. अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे प्रात्यक्षिकही संकेतस्थळावर आहे.

वर्ग-1 साठी पद व जागा
सहायक विक्रीकर आयुक्त (45 पदे), उपनिबंधक, सहकारी संस्था (21), उपमुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (72), वर्ग-2साठी कक्षअधिकारी (4), सहायक गट विकास अधिकारी (100), सहायक निबंधक सहकारी संस्था (11), उपअधीक्षक भूमिअभिलेख (6), उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (1), सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (1), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (4) अशी वर्ग-1साठी 138 तर वर्ग-2साठी 127 अशी एकूण 265 पदांसाठी ही भरती होणार आहे. महिला व खेळाडू व अनुसूचित जाती, जमाती इतर मागासवर्गीयांसाठी पदे निर्माण करण्यात आली आहेत. यासाठी 19 ते 33 वर्षे वयोर्मयादा आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत 12 फेब्रुवारीपर्यंत आहे. याविषयीच्या सुचना www.mpsconline.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.