आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापील किमतीने खरेदी करा पाण्याची बाटली वैधमापन विभागाचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बाटली बंद थंड पाण्यासाठी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या दुकानदारांवर वैधमापनशास्त्र विभागामार्फत कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांनंतर पाण्याविषयी ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत थेट कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील बाटलीवर जी छापील किंमत आहे तेवढेच पैसे द्यावे, असे आवाहनदेखील वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.
तापमानाने चाळिशी पार केली आहे. यामुळे कोरड पडलेल्या घशाला थंडाव्याची गरज भासू लागली आहे. यासाठी थंड पाण्याचा वापर वाढला आहे. याचा गैरफायदा घेत दुकानदार १५ ते २० रुपयांच्या एक लिटर पाण्याच्या बाटलीवर कुलिंगचार्ज म्हणून दोन रुपये अतिरिक्त घेत ग्राहकांची लूट करीत आहेत. ग्रामीण भागात तर रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याने ही बाटली २० रुपयांपर्यत जाते. वैधमापन विभागाकडून केवळ दुधाच्या पिशव्यांवर कारवाई होत होती. मात्र, राज्याचे वैधमापनशास्त्र विभागाचे आयुक्त संजय पांडे यांनी यासंबंधीचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैधमापनशास्त्र विभाग आता पाणी विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. शहरात दररोज विविध भागात सुमारे १० हजार बाटली बंद पाण्याची विक्री होते. दुकानदाराने एका बाटलीमागे दोन रुपये जरी अतिरिक्त घेतले तरी दिवसाला २० हजार रुपयांची कमाई विक्रेत्यांची होते.

व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करणार

राज्य आयुक्तांकडून बाटली बंद पाणी विक्रेत्यांवर कारवाई संबंधीच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार सर्व उपविभागांना त्या देण्यात आल्या आहेत. अधिक पैसे घेणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ग्राहकांनीही यासाठी पुढे येऊन तक्रारीद्वारे याप्रकाराची माहिती द्यावी. एस.वाय.अभंगे, सहायक नियंत्रक वैध मापनशास्त्र विभाग

ग्राहकांनी तक्रारींसाठी पुढे यावे

वितरकाकडून विक्रेत्याला नफा होईल, या हिशेबानेच घाऊक दरात बाटल्या दिल्या जातात. मात्र, अधिक नफा मिळवण्यासाठी दुकानदार कुलिंग चार्ज आकारतात. त्यामुळे ग्राहकांकडून अधिक पैसे घेणे थांबले नाही तर भविष्यात वितरकांनाही आरोपी करण्याचा इशारा वैधमापनशास्त्र विभागाने दिला आहे. यासाठी पाण्याच्या बाटलीसाठी अतिरिक्त पैसे घेणाऱ्या दुकानदाराविरुद्ध ग्राहकांनी तक्रार नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.