आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाड्याच्या हट्टापायी सबस्टेशनचे अडले घोडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उदासीन नगरसेवक व वीज कंपनीच्या नाकर्तेपणामुळे गोलाणी मार्केटमधील सबस्टेशनचा प्रस्ताव रखडत आहे. शहरातील खुल्या भूखंडाचे र्शीखंड करून त्याची खिरापत वाटणार्‍या महापालिकेचे पदाधिकारी या जागेपोटी किमान बारा हजार रुपये भाडे मिळावे या हट्टापोटी अडून आहेत. तर क्रॉम्प्टन कंपनीने यातून आता अंगकाढू धोरण स्वीकारले आहे. जनतेच्या भावनांशी खेळू पाहणार्‍या खाजगी कंपनी व महापालिका पदाधिकार्‍यांबद्दल जळगावकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

भूखंडाची खैरात सुरूच
शहरातील सुमारे 450 भूखंडाची खैरात विविध संस्थांना वाटली आहे. यापैकी 399 संस्थांनी कागदोपत्री भूखंड ताब्यात घेतल्यावरही ते विकसित केलेले नाही. मात्र अत्यावश्यक सेवा असलेल्या विजेसाठी दोन हजार फूट जागा देण्यास महापालिकेचा अट्टाहास कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रॉम्प्टननेच गोलाणी मार्केटमध्ये सबस्टेशन उभारण्याविषयी प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्याच्या वल्गना महापौर किशोर पाटील यांनी केल्या होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या महासभेत यावर साधी चर्चा करणेही टाळण्यात आले. यासाठी खाजगी कंपनीसोबत दोन बैठकाही घेण्यात आल्या होत्या. मात्र, आपण याकामी सकारात्मक असलो तरी, अन्य नगरसेवकांचा या जागेपोटी भाडे वसूल करण्याचा अट्टाहास असल्याचे महापौर सांगतात.

पडद्याआडचे मुख्य विरोधक कोण?
सबस्टेशनमुळे अध्र्या शहराची विजेची समस्या सुटणे शक्य असताना या विकास प्रक्रियेच्या कामी काही नगरसेवक पडद्याआडून विरोध करीत आहेत. नियोजित सबस्टेशनच्या जागेतून महापालिकेसाठी महिन्याकाठी काही उत्पन्न मिळवू पाहणार्‍या या महाभाग पदाधिकार्‍यांचे मात्र शहरातील पडून असलेल्या शेकडो खुल्या जागा यातून उत्पन्न मिळविण्याची बुद्धी सुचत नसल्याची स्थिती आहे. यातून लाखो रुपयांचा महसूल भाडे मिळविणे शक्य असताना, राजकीय वलयातून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जाते.

बहुपयोगी प्रकल्पास खीळ
शहरात विजेच्या समस्या सोडविण्याकामी होऊ पाहणारे काम रोखण्यात नगरसेवकांकडून होणारा विरोध समोर येत नसल्याची स्थिती आहे. परिणामी शहरात एखादा चांगला बहुपयोगी प्रकल्प उभा राहत असताना एकतर्फी विरोधामुळे त्यास खीळ बसत आहे.