आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीत ध्वनिक्षेपकावर सूचना, घरपाेच तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने आता बसमध्ये ध्वनिक्षेपक यंत्रणा, घरपोच तिकीट सेवा देण्याची सुविधा देण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात निवडक काही जिल्ह्यांत ही सुविधा दिल्यानंतर संपूर्ण राज्यात तिची अंमलबजावणी केला जाणार आहे.

या प्रकारातून आगाराचे उत्पन्न वाढविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून आणखी नव्या योजनांची माहिती त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली आहे. यात लग्न, वऱ्हाडांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रासंगिक करारावरील गाड्या या पुढे समजवून त्यावर ‘शुभमंगल’ असे नाव दिले जाणार आहे. शालेय विद्यार्थांना सहलीसाठीही यापूर्वी एसटी बसेस दिल्या जात होत्या. यात बदल करून सहल असे नामकरण केले जाणार आहे. या दोन्हींसाठी तांत्रिकदृष्ट्या भक्कम तसेच सुशोभित केलेल्या गाड्या देण्यावर भर असणार आहे.

थांब्याची उद‌्घाेषणा
मुंबई शहरात लोकलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपकाच्या सुविधेप्रमाणेच ही सुविधा बसमध्येही वापरली जाणार आहे. राज्यात अनेक मार्गावर विनावाहक बसेस धावतात. गाडी वेगात असल्यास प्रवाशांना कोणत्या थांब्यावर उतरावे, याचा गोंधळ उडतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी थांब्याची माहिती ध्वनिक्षेपकावरून दिली जाणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सुविधा असणार आहे.

पाच शहरांत घरबसल्या मिळणार तिकिटाची साेय
खासगी आराम गाड्यांकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी फोनवरून तिकीट बुकिंगची साेय दिली जाते. महामंडळानेही ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू केली असली तरी या सुविधेचा लाभ घेण्याकडे कल कमी असल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रवाशांना थेट घरपोच तिकिटे देण्याचा उपक्रम महामंडळाकडून राबविला जाणार आहे. लांबपल्ल्यांची तिकिटे प्रवाशांना घरपोच दिली जाणार आहेत. यासंबधीचे नियोजन आगार स्तरावर सुरू करण्यात आले आहे येत्या महिन्याभरात राज्यातील निवडक पाच शहरांमध्ये केली जाणार अाहे. यास प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्व आगारांमध्येही लागू होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...