आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी सेवानिवृत्तांचे महामंडळाकडे नऊ कोटी पडून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजनाच्या अभावामुळे राज्यातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पीएफ व उपदानाचे बिनव्याजी 8 कोटी 81 लाख रुपये शासनाकडे पडून आहेत. त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचा-यांना आर्थिकसंकटांशी झगडावे लागत असल्याची स्थिती आहे.
सेवानिवृत्तांच्या भविष्यनिर्वाह व उपदानाची हजारो प्रकरणे एसटी व्यवस्थापनाकडे पडून आहेत; मात्र याकडे विभागाचे व परिवहनमंत्र्यांचे दुर्लक्षच झाले आहे. याविरोधात निवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचा कित्येक वर्षांपासून लढा सुरूच आहे. ग्रॅज्युईटी म्हणजेच उपदान हा कर्मचा-यांचा हक्क आहे; परंतु महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे 29 सेवानिवृत्त कर्मचा-यांचे उपदानाचे 28 लाख 11 हजार 693 रुपये महामंडळाकडे पडून आहेत. केवळ वारस दाखला व ना-हरकत दाखला यासारख्या क्षुल्लक कारणांमुळे सदर कर्मचा-यांना रकमा वेळेवर दिल्या जात नाहीत. एसटी प्रशासनाकडे 1992 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांची प्रकरणे विनाकारण रेंगाळत आहेत. अंशदायी भविष्य निधी विनिमय 1956 च्या कलमाप्रमाणे विहित दराने पीएफवर व्याज देण्याचा नियम आहे; मात्र पीएफ ट्रस्टींकडून या नियमांची पायमल्ली होत आहे. 30 दिवसांत पेमेंट करणे बंधनकारक असते. त्यामुळे यापुढे 10 टक्के सरळ व्याज आकारण्यात येईल. निवृत्तांचा लढा तीव्र करण्यात येणार आहे, असे एसटी संघटनेचे कार्याध्यक्ष आर.बी.पाटील यांनी सांगितले.