आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसप्रवास महागणार;12 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महागाईने मेटाकुटीस आलेल्या सामान्य जनतेला आता एसटी भाडेवाढीला समोरे जावे लागणार आहे. एसटी महामंडळाने 12 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला असून, लवकरच ही भाडेवाढ लागू होणार आहे. भाडेवाढीसंदर्भातले पत्र विभाग नियंत्रकांना प्राप्त झाले आहे.

प्रवाशांना प्रतिकिलोमीटरमागे आजच्या भाड्यापेक्षा 20 ते 24 पैसे भाडेवाढ होणार आहे. याविषयी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. मात्र, यावर निर्णय न झाल्याने अद्याप ती जाहीर करण्यात आलेली नाही.

एसटी महामंडळाने नुकताच 29.5 टक्के वेतनवाढीचा करार केला. त्यामुळे होणारी तूट भरून काढण्यासाठी हा बोझा आता प्रवाशांवर टाकला आहे. 12 टक्के प्रवासभाडेवाढ करून प्रवाशांकडून हा भार वसूल करण्यात येणार आहे. महामंडळाने यासाठी अँक्शन प्लॅन तयार केला आहे. ही भाडेवाढ एक जुलैपासून लागू केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याविषयीचे पत्र विभाग नियंत्रकांना प्राप्त झाले आहे. भाडेवाढीसाठी तयारीत रहा, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. डिझेलच्या दरामधील वाढ लक्षात घेऊन आगारासाठी खासगी पेट्रोलपंपावरून डिझेलची खरेदी सुरू आहे. त्यामुळे डिझेलच्या खरेदीतून काही प्रमाणात पैशांची बचत होत आहे.

अशी असेल भाडेवाढ
सहा किलोमीटरचा एक टप्पा यानुसार भाडेवाढ आकारली जाते. त्यामुळे मागील भाडे व त्यात 12 टक्क्यांची वाढ असे धरून ही भाडेवाढ अमलात आणली जाणार आहे. या भाडेवाढीचा फटका लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना बसणार आहे.

गाडी जुने भाडे नवे भाडे
सर्वसाधारण 5.40 पैसे 6.05 पैसे
रातराणी 6.30 पैसे 7.05 पैसे
सेमी-लक्झरी 7.20 पैसे 8.10 पैसे

बस भाडेवाढ करण्याविषयीच्या महामंडळाच्या सूचना आगाराला प्राप्त झाल्या आहेत. मात्र, याविषयी अद्याप विस्तृत माहिती दिलेली नाही. डी.एम.कदम, विभाग नियंत्रक, जळगाव