आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिउत्साही पालकांमुळे विद्यार्थी रडकुंडीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सेंट जोसेफ शाळा व विवेकांनद प्राथमिक विद्यालय (सुयोग कॉलनी) येथे रविवारी महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एमटीएस) परीक्षा झाली. सेंट जोसेफ शाळेतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या साडेतीन हजार पालकांनी शाळेच्या आवारात एकाच वेळी गर्दी केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. या वेळी पालकांच्या धावपळीत अनेक विद्यार्थी दाबले गेले. पालकांच्या अतिउत्साह अन् काळजीमुळे परीक्षार्थी विद्यार्थी रडकुंडीस आले होते. विशेष म्हणजे, या प्रकारानंतर पालकांनी परीक्षा घेणार्‍या प्रशासनालाच वेठीस धरले. एकंदर, या प्रकारामुळे परीक्षेला अर्धा तास विलंब झाला.

शहरात रविवारी दिवसभरात एमटीएसचे तीन पेपर झाले. या वेळी 2,147 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सेंट जोसेफ शाळेत पालकांच्या गोंधळामुळे 11 वाजता सुरू होणारी परीक्षा अर्धा तास उशिरा सुरू झाल्याने दोनऐवजी 2.30 वाजता संपली. तसेच पेपर संपल्यानंतर विद्यार्थी शाळेतून बाहेर पडण्याआधीच पालकांनी अतिकाळजी करीत आपापल्या पाल्यांना घेण्यासाठी एकाच वेळी घोळक्याने प्रवेश केला. विद्यार्थ्यांची बाहेर येण्याच्या आणि पालकांची पाल्यांपर्यंत पोहोचण्याच्या एकाच वेळी झालेल्या गडबडीमुळे अनेक विद्यार्थी दाबले गेले. त्यामुळे परीक्षा घेणार्‍या प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून माइकमधून सूचना देणे सुरू केले. ‘पालकांनी शाळेच्या गेटबाहेर उभे राहावे, विद्यार्थ्यांना रांगेत शाळेतून बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांनी पाल्यांना घेऊन जावे’ अशी सूचना दिली; मात्र अतिउत्साही पालकांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केले. शाळेच्या जिन्यांवर विद्यार्थी आणि पालकांची एकच गर्दी झाली. त्यात विद्यार्थी दाबले गेले. दरम्यान, या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश देशमुख यांनी पुढाकार घेतला; मात्र फारसा फायदा झाला नाही.


आयोजक म्हणतात..
दरवर्षी आम्ही शहरात तीन केंद्रांवर परीक्षा घेतो; मात्र यंदा एमपीएससी परीक्षेमुळे दोनच शाळा उपलब्ध झाल्या. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी झाली. गर्दी पाहून आम्ही पोलिसांना बोलावून घेतले. सुभाष महाजन, आयोजक, एमटीएस परीक्षा

काय म्हणतात पालक?

  • ड्यूटी सोडून आलो. तसेच नंबर शोधण्यासाठी अर्धा तास लागला. नंबर चुकीचे होते. माहिती द्यायलाही कोणी उपलब्ध नव्हते. दादाभाऊ पाटील, पालक, रामानंदनगर
  • मुलांना काही होऊ नये म्हणून सोडायला आलो. व्यवस्था योग्य नसल्यामुळे सर्वांनाच त्रास झाला. प्रमोद गोसावी, पालक, जुने जळगाव
  • मूल लहान असल्याने वर्गापर्यंत सोडणे आवश्यक होते; मात्र इतर पालकांनीही गर्दी केली. त्यामुळे मुले दाबली गेली. राजेश नाईक, पालक, महाबळ