आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगर ग्रामपंचायतीत अपहारप्रकरणी तीन तासांच्या ठिय्यानंतर मिळाले लेखी आश्वासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुक्ताईनगर ग्रामपंचायतीत झालेल्या अपहाराच्या चौकशीप्रकरणी शिवसेनेने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांना घेराव घालून त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासन देण्यासाठी पाटील यांना तब्बल तीन तास लागले.
ग्रामपंचायतीत अपहार आणि भारत निर्माण योजनेच्या चौकशीसाठी शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांकडून जानेवारी 2013 पासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून कुठलीच कार्यवाही केली जात नव्हती. यासंदर्भात बुधवारी मुक्ताईनगर येथील शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेत राजन पाटील यांना घेराव घातला. 2007 पासून भारत निर्माण योजनेचे काम सुरू असून अद्याप 50 टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही. हे काम साडेचार कोटी रुपयांचे असून 90 टक्के रक्कम संबंधित ठेकेदारास अदा केली आहे. तसेच वर्षभरात 25 ते 30 लाखांचा अपहार झाला असून ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घ्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी लावून धरली. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर दालनातून बाहेर पडणार नाही, असा निर्णय पदाधिकार्‍यांनी घेतला. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्या रूपाली चोपडे, दिलीप चोपडे, सुनीता सोनवणे, मनीषा महाजन, सुवर्णा चौधरी, गोपाल सोनवणे, छोटू भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तब्बल तीन तास घेराव घातल्याने राजन पाटील व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पुरुषोत्तम ठाकूर यांना जागेवरून हलतादेखील येत नव्हते. त्यातच त्यांना शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुक्ताईनगर येथील गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांना फोन लावला असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली. तर काही वेळानंतर त्यांचा फोन ‘स्वीच ऑप’ आला.
15 दिवसांत चौकशी
भ्रष्टाचाराची चौकशी 15 दिवसांत करण्यात येईल. यासाठी अमळनेर येथील गटविकास अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन राजन पाटील यांनी लेखी दिले. त्यावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. अगोदर ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घ्या, अशी मागणी लावून धरली. त्यातच शिपायाकडून निरोप आला की साहेब, तुम्हाला रक्षा खडसे यांनी फोन करायला सांगितले. यावरून आंदोलकांमध्ये अधिक भडका उडाला.
लेखी आश्वासनानंतर निवळला वाद
भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी होत नाही तोपर्यंत ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांच्याकडील पदभार काढून घेण्याचे लेखी पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर हा वाद निवळला. अन्यथा शिवसैनिक आक्रमक आंदोलन करण्याच्या तयारीनिशी जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. वाद चिघळणार हे लक्षात घेऊन पोलिसदेखील आंदोलनस्थळी दाखल झाले होते .
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांना घेराव