आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मल्टिपर्पज ट्रेनिंग सेंटरचे काम ठप्प; सर्वशिक्षा अभियानांतर्गत 23 लाख 50 हजारांचा निधी मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग समावेशित शिक्षण योजनेच्या माध्यमातून अपंग विद्यार्थ्यांसाठी धुळे तालुक्यातील बाळापूर येथे मल्टिपर्पज रिसोर्स अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र, या सेंटरचे बांधकाम निधीअभावी दोन वर्षांपासून रखडले आहे.
अंध, अपंग व मतिमंदांसह विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांत मल्टिपर्पज रिसोर्स अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील केवळ नऊ जिल्ह्यांमध्ये हे सेंटर होणार असून, त्यात धुळे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानुसार धुळे तालुक्यातील बाळापूर येथील शाळेत हे सेंटर उभारण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासनातर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत 30 मार्च 2011 रोजी 23 लाख 50 हजारांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्या आदेशान्वये 2011मध्येच धुळे तालुका पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पंचायत समितीने हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला. ज्या शाळेत या सेंटरचे काम होणार आहे त्या शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिकांनी सुरुवातीला या सेंटरच्या बांधकामाची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. मात्र, त्यानंतर विशेष बाब म्हणून शाळेतील उपशिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सेंटरचे काम सुरू करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी उलटला. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला 2012मध्ये सुरुवात झाली. काम एक वर्ष उशिरा सुरू झाल्याने खर्चात वाढ झाली. दुसरीकडे शालेय व्यवस्थापन समितीने मंजूर निधीत शक्य तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु निधीअभावी गेल्या दोन वर्षांपासून या सेंटरचे बांधकाम रखडले आहे. ते पूर्ण करण्यासाठी पाच लाख 75 हजारांची गरज आहे.
उर्वरित निधी पडून
सेंटरसाठी 23 लाख 50 हजारांचा निधी मंजूर असून, त्यापैकी 17 लाख 50 हजार रुपये बांधकामावर खर्च झाले. उर्वरित सहा लाखांतून अपंगांच्या विकासासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे अपेक्षित आहे; परंतु जोपर्यंत सेंटरचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत साहित्य खरेदी करता येऊ शकत नाही. त्यामुळे हा निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यात पडून आहे.
सामाजिक संस्थांनी घेतला पुढाकार
मुंबई येथील दि रिसर्च सोसायटीने या सेंटरच्या उर्वरित बांधकामासाठी निधीसह कर्मचारी व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची तयारी काही दिवसांपूर्वी दर्शवली होती. त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
अपंग विद्यार्थ्यांवर होईल उपचारांची सोय
जिल्ह्यात शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर, मूकबधिर व विशेष गरजा असलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. या मुलांवर या ट्रेनिंग सेंटरमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या सेंटरसाठी स्वतंत्र मोबाइल टीचर व विशेष शिक्षकांची नियुक्तीही करण्यात येणार आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थी शिक्षण व समाजाच्या मूळ प्रवाहात येण्यास मदत होईल.
वाढीव निधी देण्यास नकार
सेंटरच्या बांधकामासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी सर्वशिक्षा अभियानातर्फे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला; परंतु परिषदेने वाढीव निधी देण्यास नकार दिला. परिणामी, गेल्या दोन वर्षांपासून सेंटरचे बांधकाम रखडलेले आहे. या कामाकडे जिल्हा परिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींही दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे, तालुकाभर विकासाच्या गप्पा मारणार्‍या लोकप्रतिनिधींना अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सेंटरचे बांधकाम होत असल्याची साधी कल्पनाही नाही.