आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muncipal Corporation Election : Deokar Khadse Fighting Eachother

मनपा निवडणूक : देवकर-खडसे यांच्यात खलबते!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सत्ताधारी खान्देश विकास आघाडीला पर्याय म्हणून महानगरपालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’ तयार करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. या ‘महाआघाडी’त जाण्याचा पर्याय भारतीय जनता पक्षाने खुला ठेवला असून, घरकुल घोटाळ्यातील आरोपींना महाआघाडीची उमेदवारी देऊ नये, अशी अटही ठेवली आहे.

भाजपचे नेते एकनाथ खडसे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांची रविवारी बैठक झाली. या वेळी जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांसह वादळ व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जळगाव महानगरपालिका निवडणुकीवरही तासभर चर्चा झाली. या चर्चेत सत्ताधारी खान्देश विकास आघाडीला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी आघाडी करावी का? यावर खलबते झाली. त्यात भाजपने आगामी निवडणुकीसाठी सर्व पर्याय खुले ठेवल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजप व राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांच्या झालेल्या या बैठकीनंतर आघाडीच्या चर्चेला जोर आला आहे.


आमचे धोरण निश्चित
निवडणुकीत घरकुल घोटाळ्यात नाव असलेल्या एकालाही उमेदवारी द्यायची नाही, हे आमचे धोरण ठरलेले आहे. आघाडीबाबत पदाधिकार्‍यांशी चर्चा करू. एकनाथ खडसे, भाजपनेते

योगायोगाने भेट
विश्रामगृहात मी होतो त्या वेळी खडसेही आले. त्यामुळे सोबत चहा घेतला. या वेळी मनोज चौधरी व सुरेश भोळेही असल्याने निवडणुकीवर चर्चा झाली. गुलाबराव देवकर, पालकमंत्री