आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest New In Divya Marathi

‘रुस्तमजी’च्या दादागिरीविरुद्ध स्थानिक नागरिक आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सार्वजनिक हितासाठी दिलेल्या खुल्या जागेचा शैक्षणिक संस्थेसाठी वापर करणार्‍या रुस्तमजी एज्युकेशन ट्रस्टच्या दादागिरीविरुद्ध नागरिकांनी आवाज उठवला आहे. वृद्ध, लहान मुलांसाठी असलेल्या या खुल्या जागेत स्थानिकांनाच अटकाव होत आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशालाही जुमानत नसल्याची तक्रार रामपाल भाटिया यांनी प्रशासनाकडे केली आहे.
आदर्शनगरातील मुंदडे प्लॉट भागातील जागेवर 1985-86 या वर्षी नगरपालिकेने स्थानिक रहिवाशांकरिता बगिचा तयार केला होता.
याच जागेला खुला भूखंड दाखवून 1987 साली नगरपालिकेने रुस्तमजी एज्युकेशन ट्रस्टला 24 ऑगस्ट 1987 रोजी ठराव क्रमांक 161 करून वापरायला दिला होता. त्यानंतर या जागेचा केवळ रुस्तमजी ट्रस्टसाठीच वापर झाला आणि स्थानिक नागरिक ज्यांच्यासाठी ही जागा होती, त्यांना याठिकाणी प्रवेशही नाकारला जाऊ लागला. याबाबत महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून काहीही उपयोग होऊ शकलेला नाही. परिसरातील नागरिकांनी आंदोलन, उपोषण केले आता लोकशाही दिनाच्या माध्यमातून हा लढा सुरू असल्याचे रहिवासी भाटिया यांनी सांगितले आहे.
या परिसरातील रहिवासी विजयकुमार जैन व रामपाल भाटिया यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नगररचना विभागाचे सहायक संचालकांनी 18 डिसेंबर 2013 रोजी ट्रस्टच्या अध्यक्षांना पत्र दिले. त्यात जागेच्या करारनाम्यानुसार रहिवाशांना खुल्या जागेचा वापर करू देणे बंधनकारक असल्याची आठवण करून दिली आहे. तसेच शाळेच्या वेळेत हे बंधन पाळणे आवश्यक असून रहिवाशांनीही गैरकृत्य करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. खुल्या जागेचा रहिवाशांना वापर करू द्यावा तसेच पुन्हा तक्रार होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना केली. मात्र, हा आदेश केवळ कागदावरच राहिला आहे.