आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

हुडकोला पैसे भरणे महापालिकेने केले बंद; 50 लाख रुपये दरमहा भरण्याचा केला होता सभागृहाने ठराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हुडकोच्या कर्जाचे सेटलमेंट करण्याच्या दृष्टीने प्रशासनातर्फे दरमहा 4 कोटी रुपये भरणे सुरू होते. आतापर्यंत 18 कोटी रुपये भरणा करूनही कर्जाचा आकडा मात्र कमी झालेला नसल्याने सभागृहाने दरमहा एवढी रक्कम न भरता केवळ 50 लाख रुपये दरमहा भरण्याचा ठराव केला होता. ही रक्कम हुडकोला वर्ग करावी किंवा नाही या संदर्भात प्रशासनाने राज्य शासनाकडून अभिप्राय मागवला आहे. राज्य शासनाकडून अद्याप यावर कोणताही निर्णय न आल्याने हुडकोला पैसे वर्ग करणे थांबवले आहे.

घरकुल उभारणीसाठी तत्कालीन नगरपालिकेतर्फे 1998 मध्ये हुडकोकडून 141.34 कोटी कर्ज घेतले होते. कर्जापोटी पालिकेने आजअखेर 200 कोटींच्या वर पैसे भरले आहेत. एवढे पैसे भरूनही पालिकेवर सद्य:स्थितीत 495 कोटी रुपये कर्ज बाकी असल्याचा दावा हुडकोकडून केला जात आहे. वसुलीसाठी हुडकोने डीआरटी (ऋण निर्देश न्यायालय) मध्ये धाव घेतली आहे. पालिका कर्ज फेडीसाठी अनुकूल असल्याचे दर्शवण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हुडकोच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन एस्क्रो अकाउंटच्या माध्यमातून आतापर्यंत 18 कोटी रुपये भरणा केला होता. मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही पालिकेवरील कर्जाचा आकडा कमी न होता उलट वाढला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातर्फे महासभेत ठराव करून एलबीटीतून दरमहा 4 कोटी न भरता केवळ 50 लाख भरण्याचा ठराव केला होता. या ठरावानुसार रक्कम भरावी किंवा नाही, या संदर्भात प्रशासनातर्फे राज्य शासनाकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. तूर्त एस्क्रो अकाउंटमध्ये दरमहा 50 लाख रुपये जमा करण्यात आले असले तरी ते हुडकोकडे वर्ग केलेले नसल्याचे मुख्य लेखापरीक्षक सुभाष भोर यांनी स्पष्ट केले आहे.