जळगाव- महापालिकेच्यासंपकरी कर्मचा-यांना संप काळातील दिवसांची पगार कपात टाळायची असल्यास ऐन सणासुदीत दैनंदिन कामाव्यतिरिक्त या ११ दिवसांच्या कामाचे तास भरून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे 11 दिवसांचे ८८ तास भरून देण्यासाठी त्यांना दररोज जादा वेळ काम करावे लागणार असून गरज वाटल्यास सुटीच्या दिवशीही कामावर हजर राहावे लागणार आहे. प्रशासनाच्या या बदललेल्या भूमिकेवर कर्मचारी संघटनेने आक्षेप घेतला असून या अटीनुसार काम करण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे.
पगार-पेन्शनसाठी संप करणा-या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला तांत्रिक दृष्ट्या पूर्वसूचनेची नोटीस दिली नव्हती. काही कर्मचारी तर संप करणा-या संघटनेचे सदस्यही नव्हते. एकंदरीत परिस्थिती पाहता आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचा रोष आढळून घेता पगार कपात करण्याची घाेषणा केली हाेती. केलेल्या घाेषणेनुसार कर्मचा-यांचे पगार कपात करण्यासाठी मनपा प्रशासनाने नवीन शक्कल लढवली आहे.
विविध विभागांकडून कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे हजेरी पत्रके सादर करण्याचे काम सुरू आहे. हजेरी पत्रकात ११ दिवसांमध्ये कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नावापुढे ‘संप काळ’ असा शेरा मारला जात आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचा त्या दिवसांचा पगार काढावा किंवा नाही? यावरून आस्थापना विभाग संभ्रमात होता. दरम्यान,आंदोलकांचे पगार कपात करण्यात येणार नसल्याची घोषणा आयुक्तांनी केली होती. मात्र, तसे लेखी आदेश दिले नव्हते. कर्मचाऱ्यांची संपूर्ण हजेरी दाखवल्यास विभागप्रमुख अडचणीत येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन संपकाळातील ११ दिवसांच्या बदल्यात तासिका भरून देण्याचा हा मधला मार्ग शोधून काढला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
तरच पगार कपात नाही
११ दिवस संप केलेल्या कर्मचा-यांना नियमित कामाच्या व्यतिरिक्त या दिवसांच्या तासिका भरून द्याव्या लागणार आहेत. या बोलीवरच त्यांचे संपकाळातील पगार कपात केले जाणार नाहीत. संजयकापडणीस, आयुक्त,महापालिका
जादाकाम मान्य नाहीच
आयुक्तांनीसंप काळातील पगार कपात करण्याचा शब्द जाहीररीत्या दिला होता. त्या वेळी अशी कोणतीही अट घातली नव्हती. त्यांनी
आपला शब्द पाळावा, जादा काम मान्य नाहीच. अनिलनाटेकर,अध्यक्ष,शहीद भगतसिंग संघटना