जळगाव- महापालिकेतीलरिक्त पदांवर बाहेरून अधिकारी येण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर एकापेक्षा अधिक पदांचा भार असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी त्यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढला जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी भालचंद्र बेहरे यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या उपायुक्तपदावर नवीन अधिकारी आलेला नाही. तीन वर्षांपासून अधिक काळ पालिकेत कार्यरत असलेल्या प्रभाग अधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे उपायुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. नवीन जबाबदारी सोपवली असली तरी प्रभाग अधिकारीपदाच्या कामातून त्यांना मोकळे करण्यात आलेले नाही. प्रशासनाकडून होणारा पत्रव्यवहार, अडीच हजार कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विभागातील नेहमीचे तंटे, शिक्षण मंडळ यासह बऱ्याच विभागांची जबाबदारी यामुळे गांगोडे यांच्यावरील ताण वाढला आहे. अतिरिक्त वाढलेला ताण कमी करण्यासाठी उपायुक्तपदाची सोपवलेली जबाबदारी कमी करून घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या असून अायुक्तांच्या नावे त्यांनी तसे पत्रही दिले असल्याची चर्चा आहे.
सर्व भार दोन्ही उपायुक्तांवर
पालिकेच्यामहसूल संदर्भातील जबाबदारी उपायुक्त प्रदीप जगताप यांच्याकडे आहे. एलबीटी, मालमत्ता कर असे विषय त्यांच्याकडे आहेत. उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे आस्थापनेसह प्रभाग अधिकाऱ्यांचीही जबाबदारी देण्यात आली आहेत. आयुक्तांनी कामांचे वाटप करताना दोन्ही अधिका-यांवर प्रमुख जबाबदा-या सोपवल्या आहेत.