आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्तेचे नुकसान, नगरपालिकेने दिले पोलिसांना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - जामनेर रोडवर हॉटेल हेवन समोरील दुभाजक आणि सिंधी कॉलनीमधील शौचालयाच्या तोडफोडप्रकरणी समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्र मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे यांनी बाजारपेठ पोलिसांना दिले आहे. हद्दीतील मालमत्तेचे संरक्षण करणे पालिकेची जबाबदारी असताना मुख्याधिकार्‍यांनी पोलिसांनी पत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहरात कुठेही बांधकाम अथवा इमारत पाडायची असल्यास पालिकेची परवानगी आवश्यक असते. बांधकामावरून वाद झाले तर नागरिक पालिकेत धाव घेतात. मात्र, शहरात खुद्द पालिकेची मालमत्ताच धोक्यात असल्याचे जामनेर रोड आणि सिंधी कॉलनीतील प्रकारांवरून पुढे आले आहे.

शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी नगरपालिकेने जामनेर रोडवर दुभाजक टाकले आहेत. या दुभाजकांमध्ये फूलझाडेही लावण्यात आली आहेत. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुभाजकांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची पडझड सुरू झाली, तर बहुतांश फूलझाडे मोकाट गुरांनी फस्त केली. अशातच गेल्या पंधरवड्यात जामनेर रोडवर हॉटेल हेवन समोरील दुभाजक अज्ञात व्यक्तींनी एका रात्रीत तोडले आहेत. प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून याठिकाणी आता झाडे लावण्याची क्लृप्ती शोधण्यात आली आहे. तसेच सिंधी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाची तोडफोड झाली. याप्रकरणी मुख्याधिकारी सोनवणे यांनी बाजारपेठ पोलिसांना पत्र देऊन पालिका मालमत्तेचे नुकसान करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.