आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या लाचखोर लिपिकाला केली अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दुकानाची घरपट्टी कमी करून देण्याचे सांगत 6500 रुपयांची लाच घेताना महापालिकेचा कनिष्ठ लिपिक अविनाश बाविस्करला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.महापालिकेतर्फे सध्या शहरातील नागरिकांची घरे व दुकानांच्या कर वसुलीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी पालिकेतील लिपिक पदाचे कर्मचारी विविध प्रभागात फिरून घरपट्टीबाबत नागरिकांना माहिती देत आहेत. याच कामासाठी बाविस्कर हा पाच दिवसांपूर्वी महाबळ भागातील रहिवासी असलेले कैलास पीतांबर पवार यांच्या संपर्कात आला.

पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचे आशिष पान सेंटर हे दुकान आहे. या दुकानाची घरपट्टी 14 हजार रुपयांपर्यंत भरावी लागेल, असे बाविस्कर याने पवार यांना सांगितले. मात्र, तुम्ही पालिकेत पूर्ण पैसे न भरता मला त्यापैकी निम्मे पैसे दिले तरी मी काम करून देतो, असे बाविस्कर याने सांगितले. पवार यांनी होकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर बाविस्करने वारंवार फोन करून पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली. पवार यांनी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी अँण्टी करप्शनचे उपअधीक्षक डी.डी.गवारे, मोजोद्दीन शेख, चंद्रकांत शिंदे, हेमंत शिरसाठ, नंदकिशोर सोनवणे, बाळासाहेब जाधव आदींच्या पथकाने शहरातील ला.ना. शाळा परिसरात सापळा रचून बाविस्कर याला 6500 रुपयांची लाच घेताना अटक केली.


अडीच तासात सात फोन
बाविस्कर याने मंगळवारी पवार यांना वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. सकाळी 10 ते 12.30 या वेळेत सात वेळा फोन केले. पवार हे अँण्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार देत असतानाही बाविस्करचे दोन फोन आले. अखेर दुपारी 1.45 वाजता ला.ना. शाळा परिसरात पवार हे लाच देण्यासाठी 7500 रुपये घेऊन गेले. पाच मिनिटांच्या चर्चेनंतर बाविस्करने 7500 रुपयांची लाच स्वीकारली. पवार यांनी काही सूट देण्याची विनंती केल्यानंतर त्याने 1 हजार रुपये परत केले. याच वेळी सापळा लावून बसलेल्या अँण्टी करप्शनच्या कर्मचार्‍यांनी बाविस्करला पकडले.


कर निर्धारणाची पद्धत
पालिकेतर्फे शहरातील मालमत्तांचे पुरवणी सर्वेक्षण सुरू आहे. नव्याने बांधकाम झालेल्या मालमत्तांचे मोजमाप करून कर निर्धारणासाठी 36 अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच संबंधित अभियंत्यांच्या मदतीला त्या-त्या युनिटमधील लिपिक आहेत. हे अभियंते नवीन मिळकतीचे मोजमाप करून पालिकेतील प्रभाग अधिकार्‍यांकडे माहिती सादर करतात. प्रभाग अधिकार्‍यांकडून कर निर्धारण (मालमत्ता कर निश्चित करणे) करण्यासाठी संबंधित मालमत्तेचा वापर व्यावसायिक, रहिवास, औद्योगिक किंवा भाड्याने देण्यासाठी आहे, याचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे बांधकामाचे स्वरूप आरसीसी, लोडबेअरिंग, चुना-विटांच्या भिंती, पत्रे व पार्टीशन नेमके कसे आहे, याचा विचारही मूल्यांकनासाठी केला जातो.


असे आहे सूत्र
बांधकामाचे चटई क्षेत्र * मालमत्तेचे बाजारमूल्य 12 * रु 10 = वार्षिक मालमत्ता कराची रक्कम.
भाड्याने दिलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन सूत्र : प्रत्यक्ष भाडे * 12 रु बरोबर येणार्‍या रकमेतील 90 टक्के रकमेला * रु 38 = मालमत्ता कराची रक्कम.


अशी आहे बाविस्करची पालिकेतील कारकीर्द
21 नोव्हेंबर 1992 : वॉचमन म्हणून भरती (पाणीपुरवठा विभाग)
1 मार्च 1993 : नाकेदार म्हणून पदोन्नती
13 मे 1997 : लिपिकपदी पदोन्नती
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेत पदवीधर, लोकल सेल गव्हर्नमेंट डिप्लोमा उत्तीर्ण, शॉर्टहॅण्ड कोर्स उत्तीर्ण
कार्यरत विभाग : 1997पासून लिपिक म्हणून एकाच जागी कार्यरत


निलंबनाची कारवाई होणार
लाच प्रकरणात पालिकेचा लिपिक अडकल्याचे वृत्त समजले आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी किंवा पोलिस यंत्रणेकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यावर संबंधित कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. अविनाश गांगोडे, उपायुक्त, पालिका