आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याद्यांनी बदलविले मतांचे गणित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रारूप मतदार यादीवरील हरकतींनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात एका प्रभागातील मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागात गेली होती. त्याची खात्री करून त्या प्रभागात ती नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रभागातील एकूण मतदारांच्या संख्येत बदल झाला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या याद्यांवर अनेकांनी हरकती घेतल्या होत्या. साधारणपणे एक हजार मतदारांनी हरकती नोंदवल्या होत्या. बहुतांश हरकती ह्या एका प्रभागातील नावे दुसर्‍या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या होत्या. प्रभागातील पाचशे ते हजार मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली आहे.

त्यामुळे या हरकतींवर कामकाजादरम्यान निवडणूक विभागातील कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन तसे त्याचे लेखीही घेतले आहे. त्यानंतर बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात 35 प्रभागातील मतदारांच्या संख्येत बदल झाला आहे. या मतदार याद्या सर्व प्रभाग कार्यालयात नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. प्रभागातील मतदारांची संख्या कमी-जास्त झाली आहे. मात्र, एकूण मतदारांची संख्या दोन लाख 69 हजार 528 ही पूर्वीइतकीच आहे. त्यातून कोणत्याही मतदाराला वगळण्यात आलेले नाही.

23 हजार मतदारांची नावे डिलिट
महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात 23 हजार मतदारांना डिलिट करण्यात आले आहे. यात मृत्यू झालेले, डबल नाव असलेले, स्थलांतर करण्यात आलेल्या मतदारांची नावे डिलिट करण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादीत कोणती नावे डिलिट झाली आहेत याची माहिती देण्यात आली होती. त्या यादीमध्ये ते प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे अंतिम मतदार यादीत ही नावे देण्यात आलेली नाहीत. तर नावे वगळण्याचा अधिकार केंद्रातील अधिकार्‍यांना आहे.

एकूण मतदार संख्येत बदल
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदारांनी घेतलेल्या हरकतींनंतर त्यांचे निरसन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे नाव त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने पूर्वीच्या एकूण मतदार संख्येत बदल होऊन प्रभाग क्रमांक 34मध्ये सर्वाधिक मतदारसंख्या 11 हजार 244 इतकी आहे. तर सर्वात कमी मतदार संख्या प्रभाग क्रमांक 28मध्ये पाच हजार 496 इतकी आहे.

अंतिम यादीचे अवलोकन
महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्या मतदार याद्या नागरिकांना अवलोकनार्थ प्रभाग कार्यालय, नगररचना कार्यालय, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. मतदार याद्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तसेच याद्या विक्रीसाठी महापालिकेत ठेवण्यात आल्या आहेत. या याद्या प्रभाग कार्यालयात उपलब्ध असल्याने त्या भागातील नागरिकांनी प्रभाग कार्यालय गाठले.

सर्वाधिक वाढ आणि कमी झालेले मतदार
प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात काही प्रभागात मतदार वाढले तर काही ठिकाणी कमी झाले आहेत. यात सर्वाधिक दोन हजार 177 मतदार प्रभाग क्रमांक 21मध्ये वाढले आहेत. तर प्रभाग क्रमांक 22 मधून सर्वाधिक दोन हजार 615 मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे प्रभागातून साधारणपणे 500 ते दीड हजारांपर्यंत मतदारांच्या नावाच्या हरकतीनुसार त्या - त्या प्रभागात नावे टाकण्यात आली आहेत. यासाठी मोठय़ा प्रमाणात हरकती दाखल झाल्या होत्या. त्या हरकतींवर शेवटपर्यंत काम सुरू होते. तर ग्रामीण भागातील मतदारांचा या यादीमध्ये शोध घेण्यात आला आहे. त्या नावांवर चिन्ह दर्शविण्यात आले आहे.