आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचे मिशन ‘इलेक्शन’; सराईत गुन्हेगारांवर लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनातर्फे आत्तापासूनच सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यातून पोलिस कुमक मागवण्यात येणार आहे.

महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकेसाठी 15 डिसेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकांसाठी धुळे शहर तसेच ग्रामीण भागातील पोलिसांच्या मदतीसाठी इतर जिल्ह्यातून वाढीव कुमक मागवण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात जिल्हा पोलिस दलातील सुमारे एक हजार 700 कर्मचारी बंदोबस्तावर तैनात असतील. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी पोलिस, राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची मदत घेतली जाणार आहे. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असले तरी महापालिकेच्या निवडणुकीसाठी लागणारा बंदोबस्त, मतदान केंद्राच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासही प्राधान्य दिले आहे.

जिल्हा वाचक शाखेतर्फे बंदोबस्ताचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे. कोणत्या मतदान केंद्रावर किती पोलिस बंदोबस्त द्यावा लागेल याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, निवडणूक व मोहरमच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश 27 नोव्हेंबरपर्यंत लागू असतील, असे कळवण्यात आले आहे. महापालिकेत गेल्या आठवड्यापासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.