आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

900 टँकर वापरले 5 वर्षांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या काही नगरसेवकांनी पाच वर्षांत नऊशे टॅँकर पाणी नागरिकांना पुरवले ; परंतु टॅँकर वापरापोटी त्यांनी सुमारे तीन लाखांची पाणीपट्टी भरली नव्हती. ज्या नगरसेवकांनी पाणीपट्टी थकवली आहे, त्यातील अनेक नगरसेवक पुन्हा निवडणूक लढणार असल्याने त्यांना आता पाणीपट्टी भरण्याची आठवण झाली आहे.

महानगरपालिकेची सन 2008मध्ये दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. त्याचबरोबर नागरिकांना विविध सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या. त्यातही अनेक नगरसेवकांनी पाच वर्षांत महापालिकेच्या टॅँकरद्वारे अनेकांना पाणीपुरवठा केला. प्रशासनातर्फे एका टॅँकरसाठी तीनशे रुपये आकारले जातात. विद्यमान नगरसेवकांनी पाच वर्षांत एक हजारपेक्षा जास्त टॅँकर पाणी नागरिकांना पुरवले. त्यातील काही नगरसेवकांनी वेळेवर पाणीपट्टी भरली असली तरी अनेकांनी ती न भरणे पसंत केले. त्यामुळेच 900 टॅँकरच्या पाण्यापोटी महापालिकेचे तब्बल तीन लाख रुपये थकले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. काही नगरसेवकांनी थकित पाणीपट्टी भरण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

मोबाइलनेच देतात सूचना
शहरात गणेशोत्सव, नवरात्रासह वर्षभरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांसाठी नगरसेवकांकडे त्या-त्या वॉर्डातील सार्वजनिक मंडळांतर्फे पाण्याच्या टॅँकरची मागणी करण्यात येते. त्यानंतर नगरसेवक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात दूरध्वनी करून संबंधित भागात पाण्याचा टॅँकर पोहोचवावा, अशी सूचना देतात. त्यानंतर ज्या नगरसेवकाने पाण्याच्या टॅँकरसाठी दूरध्वनी केला असेल त्या नगरसेवकाच्या नावापुढे टॅँकरची नोंद करण्यात येते. काही नगरसेवक लगोलग टॅँकरचे पैसे भरून मोकळे होतात तर काही नगरसेवकांना थेट पाच वर्षांनंतर दुसरी निवडणूक लढवण्याची वेळ आल्यावर टँकर वापराच्या पाणीपट्टीपोटी थकीत पैसे भरण्याची आठवण होते.

आता पैसे भरण्यासाठी धावपळ
राज्य निवडणूक आयोगातर्फे महापालिकेच्या निवडणुकीसाठी नुकताच कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 15 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 19 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जासोबत महापालिकेची कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र प्रत्येकाला जोडावे लागते. जर थकबाकी असेल तर उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी बाद केला जातो. याची इच्छुक उमेदवारांना कल्पना असल्याने विद्यमान नगरसेवकांनी आता थकवलेल्या टॅँकरची पाणीपट्टी भरण्यास प्राधान्य दिले आहे.