आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांनो, अशी करा नोंदणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. असे असले तरी कुणाला निवडून द्यायचे, हे मतदारांच्याच हाती आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणेही गरजेचे आहे. त्यासाठी तहसील कार्यालयातील स्वतंत्र कक्षात वर्षभर नावनोंदणी सुरू असते. दरम्यान, महापालिका निवडणुकीत मतदान करण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्‍या नव्या मतदारांना शनिवारपूर्वी तहसील कार्यालयात अर्ज जमा करावे लागणार आहेत; अन्यथा त्यांना शहराच्या विकासात सहभाग नोंदवण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी काय करावे लागले, याविषयीच्या अनेक शंकांचे निरसन व नावनोंदणी कशी करावी? या प्रo्नाचे उत्तर आम्ही या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत..

शनिवारपूर्वीच नोंदणी आवश्यक
जिल्हा प्रशासनातर्फे 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणारी मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यासाठी शनिवार (29 जून)पूर्वी प्राप्त होणार्‍या क्रमांक 6च्या अर्जाचा या यादीत समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर आलेल्या अर्जदारांचा यादीत समावेश होईल; परंतु ते महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अशी करावी नोंदणी
जिल्हा परिषदेला लागून असलेल्या तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातून नमुना क्रमांक 6चा अर्ज मिळवा. अर्ज काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्यातील वैयक्तिक माहिती भरा. तसेच त्यावर अलीकडे काढण्यात आलेला पासपोर्ट साइज फोटो चिकटवून, घरातील मतदार असलेल्या कुटुंबीयांची माहिती अर्जात नमूद करावी. सोबत सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात अर्ज जमा करावा. नवीन मतदारांसोबतच स्थलांतरित झालेले व यापूर्वी नोंद न केलेले नागरिकही मतदार नोंदणीचा अर्ज करू शकतात.

मतदारवाढीसाठी धडपड सुरूच
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागातील हक्काचे मतदार सुटू नयेत म्हणून इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू आहे. 30 जूनपर्यंत मुदत असल्याने गुरुवारीदेखील तहसील कार्यालयात फोटो व कागदपत्रे जमा करण्याची घाई सुरू होती. इच्छुकांनी कार्यकर्त्यांमार्फत फोटो गोळा करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. यात तरुण मतदारांचा जास्त समावेश आहे. हक्काचा मतदार या भूमिकेतून मतदार वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. याला नागरिकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसला तरी, इच्छुकांनी मात्र प्रयत्न सोडलेले नाहीत.

अधिक नावे असलेल्यांचा शोध घेणार
एकापेक्षा अधिक ठिकाणच्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनी वेगवेगळ्या पत्त्यावरील मतदान ओळखपत्रदेखील मिळवले आहे. अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांना एकाच ठिकाणी नाव ठेवण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असून, जुलैपासून ही मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेत एकापेक्षा अधिक नावे नोंदवणार्‍या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक
फोटोशिवाय 18 वर्षे पूर्ण झाल्याचा आणि त्या क्षेत्रातील रहिवासी असल्याचा पुरावा असलेली कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यात आधार कार्ड हे फोटो, वय आणि रहिवासी पत्ता या बाबींचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास जन्मतारखेचा उल्लेख असलेला शाळेचा दाखला वा वीजबिल यांच्या साक्षांकित प्रती द्याव्या लागणार आहेत.

ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध
नोंदणीसाठी आयोगाच्या ceo.maharashtra.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. येथे अर्ज केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून त्याची प्रिंट काढून संबंधित तलाठी कार्यालयाकडे पाठवण्यात येते. तसेच नोंदणी करताना दिलेल्या मोबाइल क्रमांकावर तलाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचा मॅसेज पाठवण्यात येतो. दिलेल्या वेळेत तलाठी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळण ी करून दिल्यास मतदार यादीत नोंदणी केली जाते.