आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलन्यांमध्येही होऊ शकते मतदान केंद्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणुकीत आतापर्यंत केवळ शाळा खोल्या किंवा शासकीय इमारतींचा मतदान केंद्र म्हणून आतापर्यंत वापर करण्यात येत होता. मतदारांच्या सोयीसाठी जास्त संख्येच्या सोसायट्यांमध्ये व कॉलन्यांमध्येही खासगी इमारतींमध्ये मतदान केंद्र होऊ शकते, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिले आहेत.

जळगाव दौर्‍यावर असलेल्या नीला सत्यनारायण यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. निवडणुकीसाठी प्रत्येकी 4 ते 6 प्रभागाकरिता एक या प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या दृष्टीने उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी उपलब्ध करून देण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे मागणी करण्यात येणार आहे. प्रत्येक निवडणूक अधिकार्‍यांकडे 3 सहायक निवडणूक अधिकारी असतील. यापैकी एक अधिकारी तहसीलदार संवर्गातील असेल. निवडणुकीसाठी 1 जुलै 2013 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राज्य राखीव दलाच्या तुकड्या व आवश्यक बंदोबस्ताची मागणी पालिका आयुक्तांना करता येणार आहे. 800 मतदारांसाठी एक मतदान केंद्र ठेवणे अपेक्षित आहे. केवळ शासकीय इमारतीच नव्हे तर मोठय़ा शहरांमध्ये एक हजारापर्यंत मतदार असलेल्या सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, अशा प्रकारे येथेही खासगी इमारतींमध्ये मतदान केंद्र होऊ शकतात, असे संकेत नीला सत्यनारायण यांनी दिले आहेत. या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, आयुक्त संजय कापडणीस उपस्थित होते.

दंगलीच्या हॅट्ट्रिकची भीती
पालिकेच्या निवडणुकीचा अनुभव पाहता सन 2003, 2008 मध्ये मेहरूण, तांबापुरा भागात जातीय मतदानाच्या दिवशी दंगली झाल्या आहेत. दंगलीच्या भीतीने मतदार घराबाहेर निघत नाहीत. पूर्व इतिहास पाहता या भागात दंगलीची हॅट्ट्रिक होईल यात शंका नाही. त्यामुळे या भागात निवडणूक आयुक्तांनी सक्तीचे व कठोर पावले उचलावी, अशी मागणी या भागातील नगरसेवक तथा खान्देश विकास आघाडीचे व्यवस्थापन समिती सदस्य सुनील महाजन यांनी केली आहे.

यादीत फोटो नसणे, ही प्रशासकीय चूक
दुसर्‍या निवेदनात ज्या मतदारांना निवडणूक आयोगाने मतदान कार्ड दिले आहे. मात्र त्यांचे यादीत फोटो नाही, अशा 90 हजार मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. मतदार यादीत फोटो नसणे ही प्रशासकीय पातळीवरील चूक आहे. प्रशासनाच्या चुकीचा दोष मतदारांवर लावणे अन्यायकारक आहे. वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच या संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांनी केली आहे.

खान्देश विकास आघाडीची अनोखी खेळी
आयुक्तांकडून वॉर्ड रचनेसंदर्भात हरकती ऐकून घेण्यासाठी आलेल्या असल्या तरी या संधीचा फायदा घेत सत्ताधारी खान्देश विकास आघाडीतर्फे विविध निवेदने देत तीन विषय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. खान्देश विकास आघाडीच्या नावाशी साम्य असलेली न्यू खान्देश विकास आघाडी किंवा मंच नोंदणीकृत करण्याच्या हालचाली सुरू असून तसे झाल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे नावात साम्य असलेल्या आघाडी किंवा मंचाची नोंदणी करण्यात येऊ नये, अशी मागणी केली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी जाणून घेतल्या प्रारुप वॉर्ड रचनेच्या हरकती
पालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप वॉर्ड रचनेसंदर्भात 35 हरकती घेण्यात आल्या होत्या. निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांनी बुधवारी हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी पालिका आयुक्त संजय कापडणीस, निवडणूक विभागप्रमुख उपायुक्त भालचंद्र्र बेहरे उपस्थित होते. नवीन वॉर्डरचनेत जनगणना प्रगणक गटाप्रमाणे विभागणी करण्यात आली नसल्याच्या 35 हरकती प्राप्त झाल्या होत्या. यापैकी वॉर्ड 25, 26, 28, 29, 30 व 31 मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा 10 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रगणक गट तोडण्यात आल्याची तक्रार माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी घेतली होती. ही हरकत स्वीकारली गेल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. हरकती घेणार्‍यांमध्ये नगरसेवक गणेश सोनवणे, दीपक सूर्यवंशी, डी.डी. वाणी, यांचा समावेश होता. सुनावणीच्या वेळी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष कैलास सोनवणे परिसरात उपस्थित होते.