आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जनतेचा जाहीरनामा’ आला; चेंडू नेत्यांकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावकर बंधू, भगिनींनो, धन्यवाद तुमच्या जागृततेला, कल्पकतेला आणि प्रतिसादालाही. येणार्‍या निवडणुकीसाठी ‘जनतेचा जाहीरनामा’ काय आहे, हे जाणून घेण्याच्या आमच्या प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त जळगावकरांचे आभार.

राजकीय पक्ष आणि आघाड्या काय करणार आहेत हे त्यांनी सांगण्यापेक्षा जनतेला त्यांच्याकडून कशाची अपेक्षा आहे हे त्यांना कळावं, यासाठी आम्ही ‘जनतेचा जाहीरनामा’ ही संकल्पना राबवली. जळगावकरांनी त्याचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. जनतेला काय हवं आहे हे कोणी तरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतंय, याचंच अप्रूप अनेकांना वाटतय आणि त्यासाठी ते ‘दिव्य मराठी’ला धन्यवादही देत आहेत. खरं तर आम्ही आमचं कर्तव्यच करतोय. ‘आता चालेल तुमची र्मजी’ हे आमचं प्रारंभीचं आश्वासन जळगावकर नक्कीच विसरले नसतील. जळगावकरांची र्मजी चालावी यासाठीच केलेला हा एक प्रयत्न आहे.

जळगावच्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे माहिती पाठवावी, यासाठी एक फॉर्म तीन दिवस आम्ही प्रसिद्ध केला. त्या माध्यमातून सर्वच भागातले नागरिक अभिव्यक्त झाले. अनेक सूचना आल्या, भरभरून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. त्यांचा विचार करतानाच शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, सरकारी नोकरदार आणि महाविद्यालयीन युवक, युवतींनीही आपल्या भावना व्यक्त कराव्यात म्हणून आम्ही विशेष प्रयत्न केले. या वर्गापर्यंत पोहोचून आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडूनही फॉर्म भरून घेतले. त्या सर्वांचा एकत्रित विचार करून आम्ही आज जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करीत आहोत.

जळगावकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि सूचविलेल्या योजना पाहाता त्या खूप जास्त आहेत, असे मुळीच नाही. मूलभूत आणि महापालिकेच्या आवाक्यातीलच कामांची लोकांनाही अपेक्षा आहे. ती कामे प्रामाणिकपणे केली जावीत, भ्रष्टाचाराला आळा घालू शकतील असे लोकप्रतिनिधी असावेत, अशाही जनतेच्या अपेक्षा आहेत. महापालिकेमार्फत राबवल्या जाऊ शकणार्‍या योजनांविषयीही जळगावकरांनी खूप कल्पना सूचविल्या आहेत. त्यातल्या व्यवहार्य वाटल्या त्या आम्ही जाहीर करीत आहोत. निवडणुकीला सामोरे जाणारे राजकीय पक्ष आणि आघाड्या जनतेच्या या अपेक्षांचा विचार जाहीरनामा तयार करताना करतील, अशी अपेक्षा करू या.

- दीपक पटवे, निवासी संपादक