आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्बो टीमला मतदार सापडेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यातून प्रभाग क्रमांक 20मध्ये वाढवण्यात आलेल्या 3,763 मतदारांच्या शोधासाठी अधिकार्‍यांसह 72 जणांची टीम गुरुवारी सकाळपासून कामाला लागली होती. घरोघरी चौकशी केल्यानंतर सुमारे 10 टक्के मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या विषयावरून आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी 22 रोजी मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. तसेच त्यावर हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुमारे साडेतीन हजार हरकती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या छाननीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, सभागृहात प्रमुख विरोधकाची भूमिका बजावणारे नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक 20मध्ये 3,763 मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून येत नसल्याची हरकत घेतली. तसेच याबाबत उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी या प्रभागाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

24 भागांमध्ये केले विभाजन..
नरेंद्र पाटील व पांडुरंग काळे यांनी केलेल्या तक्रारींवरून तपासणी करण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी 24 शाखा अभियंत्यांसह तेवढेच लिपिक व शिपाई अशा 72 जणांची नियुक्ती करून घरोघरी जाऊन अल्प कालावधीत मतदार यादीची तपासणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून संबंधित अधिकारी व कर्मचारी हरकत घेतलेल्या नावांचा शोध घेत होते. त्यात सुमारे 450 ते 500 नावे शेजारच्या प्रभागातील असल्याचे आढळून आली आहेत. तसेच उर्वरित बोगस म्हटल्या जाणार्‍या यादीतील केवळ 10 टक्के मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रभागात पत्त्यांवर नसलेली नावे आली कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कर्मचार्‍यांशी वाद
ओंकारनगर, गांधीनगर, जिल्हापेठ, राधाकिसननगर, विसनजीनगर, तायडे गल्ली व गुजराथी गल्ली या भागात सुमारे सात हजार मतदार असून, याच भागातील सुमारे तीन हजार मतदार पत्त्यावर आढळून येत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे पालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना बर्‍याच भागात वादाला सामोरे जावे लागले. हे मतदार असल्याचे सांगितले जात होते; परंतु प्रत्यक्षात उपलब्ध होत नव्हते. या वेळी आयुक्तांच्या सूचनेवरून नगरसेवक व तक्रारदारांचे प्रतिनिधी अधिकार्‍यांसोबत फिरत होते. तसेच नगरसेवक विष्णू भंगाळे, शरद तायडे यांच्यासह नरेंद्र पाटील यांचे बंधू विजय पाटील व त्यांचे सहकारी गल्लोगल्ली फिरताना दिसत होते. याप्रसंगी दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण तापले होते.