आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण निर्मितीचा पहिला अंक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिका निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करत इच्छुकांना आकर्षिक करण्यासाठी खान्देश विकास आघाडीतर्फे सुरू करण्यात आलेला अर्ज मागविण्याचा कार्यक्रम मंगळवारी आटोपणार आहे. वातावरणनिर्मितीच्या पहिल्या अंकामुळे आघाडीकडे कोण येवू शकणार याची चाचपणी करण्याचे काम पदाधिकार्‍यांनी केले आहे. आघाडीच्या प्रमुख नगरसेवकांनी अर्ज घेतलेला नसल्याने हा केवळ उमेदवारी अर्ज म्हणजे वातावरण निर्मिती ठरली आहे. इतर पक्षामध्ये असलेल्या शांततेचा फायदा यानिमित्ताने खान्देश विकास आघाडीने घेतला आहे. त्यांच्याकडून 205 जणांनी अर्ज घेतल्याचा दावा केला जात आहे.

खान्देश विकास आघाडीकडे इच्छुकांची गर्दी होण्यासाठी अर्ज विक्रीचा पहिला प्रयोग महत्वाचा ठरला. राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख विरोधी पक्षात सध्या महापालिकेच्या बाबतीत शांतता आहे. अशा स्थितीत इच्छुकांना योग्य दिशेने वळविण्यात अर्ज विक्री महत्वाची ठरली. उमेदवार निश्चितीचे निकष जाहीर केलेले नाहीत. आघाडीने 205 अर्ज विक्री झाल्याचा दावा केला आहे. त्यात विद्यमान नगरसेवकांची संख्या अवघी 14 आहे. अर्ज नेणार्‍यांमध्ये सविता शिरसाठ, कमल पाटील, भारती जाधव, दिलीप बाविस्कर, जिजाबाई अण्णा भापसे, संगीता दांडेकर, मनोज चौधरी, अजय सपकाळे, वर्षा खडके, सुनील महाजन, जयर्शी धांडे, प्रशांत पाटील, नितीन बरडे यांचा समावेश आहे.

विद्यमान नगरसेवकांच्या वॉर्डातून इच्छुक कोण आहेत? संबंधित इच्छुकांची जनसंपर्क किंवा ताकद किती? विद्यमान नगरसेवकांच्या तुलनेत संबंधित इच्छुकांची क्रेझ जास्त असल्यास विद्यमान नगरसेवकाला थांबवून त्याला उमेदवारी द्यावी की त्याचे इतर ठिकाणी समायोजन करावे यासंदर्भात रणनीती ठरविताना सोपे जावे, यासाठी अर्ज वाटपाचा दिखावा तर करण्यात आलेला नाहीना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगरसेवकांनाही अर्ज घेण्याचे बंधनकारक
नवीन उमेदवारांनाही संधी मिळावी या दृष्टीने अर्ज वाटप प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अर्ज घेऊन जाणारे सर्वच इच्छुक प्रबळ असतील असे नाही. मात्र दांडगा जनसंपर्क असलेल्या नवीन चेहर्‍यांना या निमित्ताने संधी मिळावी, असा या प्रक्रियेमागील उद्देश आहे. इतरांप्रमाणे विद्यमान नगरसेवकांनाही अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. नितीन लढ्ढा, गटनेता, खान्देश विकास आघाडी