आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थांच्या पाठिंब्यावर पक्षांचा डोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त सामाजिक, क्रीडा संघटना, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत राजकीय व्यक्तींचा संपर्क वाढला आहे. निवडणुकीत पाठिंबा मिळावा यासाठी प्रमुख पक्ष आणि आघाड्यांकडून संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधले जात आहेत. अशा संघटनांच्या पाठिंब्यासाठी भावी उमेदवार प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे.

जळगाव शहरामध्ये 80 वर विविध क्षेत्रांतील संबंधित संघटना आहेत. शिवाय गणेशोत्सव मंडळे, दुर्गोत्सव मंडळे, क्रीडा संघटनांचेही मोठे जाळे आहे. येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या संस्थांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे गृहीत धरून त्यांना गळ्याला लावायचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांना शहरात वापरासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे खान्देश विकास आघाडीने यापूर्वीच या संघटनांशी जुळवून घेतले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्षदेखील प्रस्थापितांच्या विरोधात असलेल्या संघटनांच्या शोधात आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निवडणुकीत ताकद वाढण्यासोबत प्रचार करणेही सोपे होणार आहे. गेल्या वर्षी गणेश मंडळांना निवडणुकीच्या दृष्टीने देणग्या देण्याचे प्रमाणही वाढले होते. सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमांना उपस्थिती देऊन त्यांच्याशी बोलणी सुरू झाली आहे.

कामे मार्गी लावण्यावर भर
महापालिकेत अनेक वर्ष प्रलंबित असलेली कामे, संस्थांची इतर कामे उरकण्यासाठी संधी म्हणून आलेल्या निवडणुकीकडे संस्थांचे पदाधिकारी सकारात्मक दृष्टीने पहात आहेत.