जळगाव- महानगरपालिका निवडणुकीत शपथपत्रात मालमत्तेची खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी नगरसेवक तथा खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांना अपात्र ठरवण्यात यावे, यासाठी मुकुंद ठाकूर यांनी दोन याचिका खंडपीठात दाखल केल्या होत्या. यापैकी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेविरोधात जैन यांनीही एक याचिका खंडपीठात दाखल केली होती.
सोमवारी यासंदर्भात झालेल्या कामकाजात औरंगाबाद उच्च न्यायालयाने जैन यांची याचिका फेटाळली अाहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल ठाकूर यांनी जिल्हा न्यायालयात इलेक्शन पिटिशन दाखल केले होते. तसेच याचप्रकरणी फौजदारी गुन्हाही दाखल केला जावा, यासाठी आणखी एक याचिका खंडपीठात दाखल केली होती. दरम्यान जैन यांनी इलेक्शन पीटिशनच्या विरोधातील अर्ज जैन यांनीच माघारी घेतला होता. तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेविराेधात जैन यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. सोमवारी न्यायालयाने ती याचिका फेटाळली अाहे. त्यामुळे जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल हाेण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे. आता दोन्ही पक्षांना ३० रोजी निवडणूक आयोगासमोर हजर राहावे लागणार आहे.