आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव तत्काळ पाठवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शासनाकडून विशेष निधी म्हणून महापालिकेला 15 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत; मात्र हा निधी खर्च कशावर करायचा, हा विषय चांगलाच गाजत आहे. महासभेत या निधीतून शहरात विविध विकासकामे करण्याचा ठराव करण्यात आला आहे. आयुक्तांनी त्या ठरावाचा प्रस्ताव तीन दिवसांच्या आत विभागीय कार्यालयात सादर करावा, अशा सूचना सोमवारी नाशिक येथे झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी केल्या.

महापालिकेचा गेल्या तीन वर्षांपासून विशेष शासकीय निधी प्रलंबित होता. तो महापालिकेला नुकताच प्राप्त झाला. या निधीतून शहरात विविध विकासकामे करण्याचे प्रथम ठरवण्यात आले. तथापि, या निधीतून महापालिका हद्दीत चांगले रस्ते करण्यात येणार होते. त्यानंतर अनेकांनी पत्रक काढून या निधीतून शहरात काय कामे करावीत ते सुचवले. त्यामुळे या 15 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून नेमकी कोणती कामे हाती घेण्यात यावी, याबद्दल मोठय़ा प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, शहराचे आमदार अनिल गोटे यांनी या निधीतून पांझरा नदीकिनारी संरक्षक भिंतीला लागून रस्ता बांधण्यात यावा, असे सांगितले. कारण याच कामासाठी शासनाकडे मागणी केल्यावर हा निधी प्राप्त झाल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या निधीचा वापर त्याच कामासाठी करण्यात यावा, असेही त्यांनी सुचवले होते; मात्र हा महापालिकेचा निधी असून, त्यातून महापालिका शाळा क्रमांक एकमध्ये प्रशासकीय इमारत बांधणे, हनुमान टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात ब्रिज-कम-बंधारा बांधणे यासह अन्य नऊ कामे नगरसेवकांनी सुचवली आहेत. तसा ठरावही महासभेत करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी त्यांनी महासभेत जो ठराव झाला त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून तीन दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. या वेळी आमदार अनिल गोटेंनीही रवींद्र जाधव यांची भेट घेऊन निधीच्या खर्चाबाबत निवेदन सादर केले आहे. त्यामुळे आता महसूल आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे