आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवकांनीच नाकारली हद्दवाढ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेची हद्दवाढ गाेत्यात अाली अाहे. सगळ्याच नगरसेवकांनी चक्क हद्दवाढ नाकारली अाहे. त्यासाठी झालेल्या विशेष सभेत एकमताने हद्दवाढीला विराेध करण्यात अाला. विशेष म्हणजे हद्दवाढीच्या प्रक्रियेचे खापर अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांच्यावर फाेडण्यात अाले. सत्ताधाऱ्यांसह विराेधकांनाही महापालिकेच्या अार्थिक स्थितीचा अंदाज अाल्याचे सभेत दिसून अाले. त्यामुळे हद्दीत सामावणाऱ्या १६ गावांना न्याय देऊ शकणार नाही, असा सूर सभेत उमटला. हद्दवाढीवर हरकत घेण्यात येत असल्याचे महापौर जयश्री अहिरराव यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या हद्दवाढीवर साधक-बाधक विचार करण्यासाठी साेमवारी विशेष सभा झाली. सभेच्या प्रारंभीच नगरसेवक संजय गुजराथी यांनी हद्दवाढीच्या सभेला आयुक्त अनुपस्थित का राहिले याचा खुलासा करावा, असे म्हणत आयुक्तांनी मंत्रालयात झालेल्या बैठकांमध्ये हद्दवाढीच्या फायद्या-ताेट्याची माहिती दिली असती तर हद्दवाढीचा विषय पुढे अाला नसता, असे सांगितले. मनपाची आर्थिक स्थिती याेग्य नाही, याची स्पष्ट कल्पना असतानाही आयुक्तांनी तशी बाजू मांडली नाही, असा अाराेपही त्यांनी केला. उपायुक्तांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, असा आग्रहही त्यांनी धरला. त्यानंतर नगरसेवक अमीन पटेल यांनीही शहरातील गरीब नागरिक कर भरू शकत नाही, हे स्पष्ट दिसते. हद्दवाढीत सामील हाेणाऱ्या १६ गावांनाही महापालिकेच्या दराने घरपट्टी नळपट्टीची आकारणी होणार आहे. त्यातच महापालिका या गावांमध्ये पूर्णपणे सुविधा देऊ शकणार नाही. शहरातीलच नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नाही. आर्थिक उत्पन्नाचे सध्या दुसरे काेणतेही साधन नाही. त्यामुळे िवकासकामेही होत नाहीत. शासनाकडून येणारे अनुदान कर्जाच्या कपातीत जात अाहे. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतींनीही हद्दवाढीला िवरोध दर्शविला आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी अमोल मासुळे, इस्माईल पठाण, चंद्रकांत केले यांनीही हद्दवाढीला विरोध दर्शविला.

हद्दवाढीला राष्ट्रवादी शिवसेनेच्या नगरसेवकांनी सारखाच विरोध दाखवला. त्यात मुद्दा मांडताना संजय गुजराथी तर हरकत नोंदवताना चंद्रकांत केले.

ध्येय-धाेरणे स्पष्ट करा
^महापालिकेची हद्दवाढ होऊन त्यात १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावंाना मूलभूत सोयी-सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. शासन अनुदान देणार आहे का तसेच हद्दवाढीसाठी शासनाची ध्येय-धोरणे काय हे स्पष्ट करावे. प्रतिभा चौधरी, नगरसेवक

राजकारणात धुळेकर वेठीस
महापालिकेची हद्दवाढ करण्यात येत आहे. शहरातील प्रभागातील समस्या साेडवत असताना शासन वरून १६ गावांची जबाबदारी महापालिकेवर टाकत आहे. ही परिस्थिती माहीत असताना केवळ राजकारण करण्यात येत आहे. मात्र, या राजकारणात हकनाक धुळेकर जनता वेठीस धरली जात असल्याचे मत चंद्रकांत केले यांनी मांडले.

प्रशासनावर नाराजी
महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो शासनाकडे पाठवला आहे. त्यासाठी वेळोवेळी मंत्रालयात महापालिका आयुक्त बैठकीला उपस्थित होते; परंतु या वेळी ही हद्दवाढ योग्य आहे काय, त्यातून महापालिकेला काय फायदा तोटा होईल याची चर्चा नगरसेवकांशी करणे आवश्यक होते, असे मत नगरसेवकांनी मांडले.

शासनाचे निर्देश अस्पष्ट
हद्दवाढीत सहभागी हाेणाऱ्या १६ गावांना सुविधा कशा देणार याची काेणतीही माहिती प्रशासनाने स्पष्ट केलेली नाही. सक्षम अधिकाऱ्यांअभावी १३६ कोटी रुपयांची पाणी योजना जीवन प्राधिकरणाकडे जात आहे. अधिकारीच नाही तर येणाऱ्या १६ गावांना पाणीपुरवठा कसा हाेईल. याेजना कशा राबवल्या जातील, याचे निर्देश प्रशासनाने समजून घ्यायला हवे हाेते, असे मुद्दे या वेळी चर्चेत मांडण्यात अाले.

ठरावप्रसंगी स्थिती चांगली
शहराची हद्दवाढ करण्यात यावी यासाठी २०१२मध्ये महापालिकेच्या सभागृहात ठराव मंजूर करण्यात येऊन तो शासनाकडे पाठवला होता. त्या वेळी महापालिकेत जकात, पारगमन शुल्क सुरू होते. आर्थिक परिस्थिती चांगली होती. मात्र, आता केवळ मालमत्ता हे उत्पन्नाचे साधन आहे. आताची आर्थिक परिस्थिती पाहता हद्दवाढ करणे पूर्णपणे अयोग्य अव्यवहार्य आहे.