जळगाव - अनेक समस्यांनी घेरलेल्या महापालिकेला अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. बर्याच प्रकरणांच्या चौकशीत गुंतलेल्या महापालिका प्रशासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पुस्तकावरील सतरा मजलीची इमारतही छापली नव्हती. आगामी काळात तर पालिकेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून वापरण्यात येणारा लोगो (चिन्ह) देखील गायब होण्याची शक्यता आहे.
महापालिका जळगाव शहराची ओळख असलेली सतरा मजली इमारत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. हुडकोचे कर्ज थकल्याप्रकरणी सतरा मजलीला सील करण्याची नोटीसही येऊन गेली आहे. अनेक गंभीर प्रकरणे याच इमारतीतून निघाले होते. तीन महिन्यांपासून मनपा प्रशासन गोलाणी मार्केट (व.वा.संकुल)च्या बांधकामासंदर्भात लेखा परीक्षण करीत आहेत. ज्या मक्तेदाराने मार्केट बांधले त्याच्याकडूनच सतरा मजलीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे गोलाणी मार्केटच्या बांधकामावर शंका असताना त्याला लागून असलेल्या सतरा मजलीचा वापर अर्थसंकल्पीय पुस्तकाच्या मुखपृष्ठावर करणे प्रशासनाने टाळल्याचे सांगितले जातेय. कारण या बांधकामादरम्यान अनेक अनियमितता समोर येण्याची शक्यता आहे. त्यात गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. त्यामुळेच असे पाऊल उचलल्याचे बोलेले जात आहे.
लोगो कायदेशीर कसा?
आता तर पालिकेच्या दस्तऐवजावर गेल्या अनेक वर्षांपासून वापरण्यात येणारा लोगोदेखील मान्यताप्राप्त नसल्याची बाब पुढे येत आहे. कारण या लोगोची नोंदणी अथवा निर्मितीबाबत कुठलाही पुरावा पालिकेच्या दप्तरी सापडलेला नाही. त्यामुळे हा लोगो कायदेशीर कसा? असाही प्रश्न उपस्थित होऊ शकताे. सर्व शक्यता गृहीत धरता तसेच पालिकेची आर्थिक स्थिती पाहता आता सध्या छापलेल्या कागदपत्रांचा वापर करून नवीन छपाईच्या आदेशात लोगो वगळण्यात येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आगामी काळात पालिकेच्या नावाव्यतिरिक्त कोणतीही नवीन ओळख पाहायला मिळणार नाही. नवीन लोगोसाठी प्रशासन नागरिकांकडून सूचनाही मागवू शकते.