आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळाची परंपरा कायम, 36 विषय मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - नगरपालिकेची बहुचर्चित अकरावी सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. त्यात फक्त 30 मिनिटात 36 विषयांना मंजुरी मिळाली. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक युवराज लोणारी यांनी विरोधी गटातील खुर्चीवर बसून पालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी या सभेला सुरुवात करण्यात आली. अजेंड्यावरील विषयांवर चर्चा सुरू असतानाच पालिकेचे नामनिर्देशित सदस्य वसंत पाटील यांनी नगराध्यक्षांवर वैयक्तिक ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय चौधरी यांनी 1 ते 36 विषय मंजूर, असे म्हणताच सभा आटोपली, हे विशेष.

पालिकेच्या सभेत पहिल्याच विषयाचे वाचन सुरू असतानाच नगरसेवक प्रा. दिनेश राठी व रमण भोळे यांनी 7 सप्टेंबरला दिलेल्या पत्रात समाविष्ट केलेले मुद्दे विषय पत्रिकेत समाविष्ट नसल्याने संताप व्यक्त केला. नगराध्यक्षांनी याबाबत सभागृहाची माफी मागावी, अथवा दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली. या विषयावर पडदा पडत नाही, तोच सत्ताधारी गटाचे नगरसेवक युवराज लोणारी यांनी 26 मे रोजी झालेल्या सभेच्या कार्यवृत्तातील बाजार मक्त्याला विरोध दर्शवला. संबंधित ठेकेदाराने गेल्या सात महिन्यांपासून पालिकेत रकमेचा भरणा केला नाही. म्हणून त्यांनी या कामाला लेखी विरोध दर्शवला.

सभेत 1 ते 13 विषयांवर चर्चा झाली. दरम्यान, नामनिर्देशित सदस्य वसंत पाटील यांनी ‘आमच्या भागात वाढीव पाणीपुरवठा योजना का नाही?’ असा प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्ष नेमाडेंनी ‘केवळ विषय पत्रिकेला अनुसरून बोलावे. अन्य चर्चा आपण नंतर करू’ असा सल्ला त्यांना दिला. मात्र, त्यानंतर हा विषय भरकटल्याने नगरसेवक विजय चौधरी यांनी संतप्त होऊन सर्व विषय मंजूर, असे जाहीर करताच सत्ताधारी नगरसेवक सभागृहाबाहेर पडले अन् सभा आटोपली. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा न झाल्याने नाराजीचा सूर उमटला.

अभय योजनेत सहभाग घेण्यावर सहमती
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक युवराज लोणारी यांनी अभय योजनेत सहभाग घेण्यावर संमती दर्शवत किती थकबाकी आहे? याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यानंतर नगराध्यक्षांनी वीज वितरण कंपनीचे वीजबिल 5 कोटी 83 लाख रुपये असून या योजनेत सहभाग घेतल्यास पालिकेला केवळ 2 कोटी 74 लाख रुपये 24 महिन्यांच्या समान हप्त्यात द्यावे लागतील, असे सांगितले.

जलकुंभाचा प्रश्न सुटणार
मुख्याधिकार्‍यांविना सभा झाल्याने रमण भोळे यांनी आक्षेप घेतला. मात्र, कलम 83 प्रमाणे मुख्याधिकार्‍यांना महत्त्वाचे काम असल्यास पिठासीन अधिकारी म्हणून पदसिद्ध नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा घेता येते, असे नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी या सभेत स्पष्ट केले.
0 घंटागाडी आणि लाइट विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर पालिका मानधनावर कर्मचार्‍यांना नियुक्ती देऊ शकत नाही. नवीन मक्ता काढावा लागणार आहे, असेही नगराध्यक्षांनी सभागृहाला सांगितले.
0 पालिकेने विषय क्रमांक 13 नुसार गांधीनगर खडका भागात जलकुंभ भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा ठराव केला. याबाबत नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी पालिका प्रशासन, सभागृहाचे मुक्तकंठाने स्वागत केले.
0 सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला माजी नगरसेवक हाजी हसमत खान, शिला निकम, उल्हास पाटील, नामनिर्देशित सदस्य हेमराज भोळे यांना र्शद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्याधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत ही सभा झाली, हे विशेष.