आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Meeting Clashes Video Footage Bhusawal

पालिकेच्या सभेत गोंधळ : व्हिडिओ चित्रीकरणाची सीडी पोलिसांच्या ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाण्याच्या विषयावरून गोंधळ झाला होता. बाजारपेठ पोलिस ठाण्यात मुख्याधिकार्‍यांनी या प्रकाराबाबत अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी गुरुवारी प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे जबाब नोंदवले. तसेच सभेचे व्हिडिओ चित्रीकरण केलेली सीडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

नगरसेविका नंदा निकम यांनी सभेत पाण्यावरून मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरून थेट व्यासपीठावरील टेबलवर पादत्राणे ठेवली होती. त्यावरून सभागृहात 10 मिनिटे गोंधळ झाल्याने सभा 10 मिनिटांसाठी तहकूब करावी लागली होती. या वेळी नंदा निकम यांनी असभ्य शब्दांचा वापर केल्याने प्रभारी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी त्यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तसेच निकम यांनीही मुख्याधिकार्‍यांनी आपल्याला जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. परस्परविरोधात दिलेल्या तक्रार अर्जांची चौकशी पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी गुरुवारपासून सुरू केली आहे. तसेच सभागृहात नेमके काय घडले? याची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरणाची सीडीही ताब्यात घेतली आहे.

साक्षीदारांचेही जबाब
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेमक्या काय घडामोडी झाल्या आहेत? याबाबत उलगडा होण्यासाठी सभा लिपिक नामदेव ठोसर यांचाही जबाब घेतला जाणार आहे. तसेच उपनगराध्यक्ष नूरजहॉँ खान व गटनेते पठाण यांनाही जबाब नोंदवण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाण्यात बोलावण्यात येणार आहे.

जातिवाचक बोललो नाही
नगरसेविका नंदा निकम यांनी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा अर्ज पोलिसांत दिला आहे. त्याच्या चौकशीसाठी बाजारपेठ पोलिस ठाण्यात बी.टी.बाविस्कर यांना गुरुवारी बोलावण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी निकम यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, सभा आटोपल्यानंतर मी पोलिस बंदोबस्तात नगराध्यक्षांच्या दालनात गेलो. त्यामुळे जातिवाचक बोलण्याचा संबंधच येत नाही, अशा आशयाचा जबाब नोंदवला आहे. निकम यांनी सभेत गैरवर्तन केल्याने त्यांचे पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याचे वाईट वाटल्याने त्यांनी खोटी तक्रार केली आहे, असेही बाविस्कर यांनी त्यात नमूद केले.

वस्तुस्थिती समोर येईल
शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दक्षता घेतली जात आहे. तसेच परस्परविरोधी केलेल्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल. प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक, बाजारपेठ पोलिस ठाणे