आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Meeting Water Issue Bhusawal

भुसावळ पालिकेत मुख्याधिकारी-नगरसेविकेत जुंपली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळ नरगपालिकेच्या सभेत गोंधळ घातल्यावरून प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नंदा निकम यांच्यात चांगलीच जुंपली. बाविस्कर यांनी निकम यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, जिल्हाधिकार्‍यांकडे अपात्रतेचा प्रस्ताव पाठवला आहे, तर निकम यांनीदेखील मुख्याधिकार्‍यांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली.

बुधवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. सभेत विषयांचे वाचन सुरू असताना नगरसेविका निकम यांनी पालिकेचे कर्मचारी एन.बी. ठोसर यांना चपलेने मारण्याची धमकी दिली. तसेच चप्पल थेट नगराध्यक्षांच्या टेबलावर ठेवली, असे प्रभारी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. नगरसेविका नंदा निकम यांच्या अर्जात विकास कामांबद्दल विचारणा केली असता, मुख्याधिकार्‍यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, निकम यांच्याशी संपर्क साधला असता, नागरिकांच्या प्रश्नांसाठी 100 वेळा गुन्हे दाखल झाले तरी सामोरे जाण्याची तयारी असल्याचे सांगितले.

यासंदर्भात नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, आपण सुटीवर असताना नगरसेविका निकम यांनी प्रभागातील पाणीप्रश्नाचा विषय मांडला होता. त्या वेळी मुख्याधिकार्‍यांनी जलकुंभ दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, समस्या न सुटल्याने निकम यांनी सभेत हा विषय मांडून जाब विचारला. व्यासपीठावर चप्पल ठेवणे हा ज्याच्या-त्याच्या मानसिकतेचा विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.

पद रद्द करण्याचा प्रस्ताव
सभा सुरू असताना कर्मचार्‍यावर चप्पल उगारणे जबाबदार नगरसेवकांना शोभत नाही. सभेत गैरवर्तन केल्याबद्दल महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमाचे कलम 42 (1) अन्वये निकम यांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे बुधवारी सायंकाळी सादर केला आहे, असे प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

आजपासून चौकशी
नगरपालिका सभागृहात झालेल्या प्रकाराची गुरुवारपासून चौकशी करणार आहे. कर्मचार्‍यांसोबतच बैठकीला उपस्थित असलेल्या नगरसेवकांचे जबाब नोंदवण्यात येतील. बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासू. प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक, भुसावळ