आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांकडेही अडकले महापालिकेचे लाखो रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रशासकीय किंवा विविध कार्यक्रमासाठी दिलेल्या अँडव्हान्समधून झालेल्या खर्चाचा हिशेब करून उर्वरित रक्कम तातडीने परत करण्याचा पालिकेतील बर्‍याच अधिकार्‍यांना विसर पडला आहे. प्रशासनाकडून वितरित झालेल्या पैशांचे काय केले याचा हिशेब लागत नसल्याची स्थिती आहे. नोटीस बजावूनही गप्प बसलेल्या संबंधित अधिकार्‍यांच्या पगारातूनच थेट वसुली सुरू झाल्याने पैसे दाबलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

पालिकेतर्फे विविध कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख किंवा पदाधिकार्‍यांच्या स्वीय सहायकांना अँडव्हान्स उपलब्ध करून दिला जातो. कार्यक्रम किंवा दिलेले काम पूर्ण झाल्यावर याचा हिशेब व उरलेली रक्कम पुन्हा अर्थ विभागात जमा करणे अपेक्षित असते. मात्र पालिकेत तीन-चार वर्षात झालेल्या महिला बालकल्याण समिती सदस्यांचे अभ्यास दौरे, वेळोवेळी आयोजित विविध कार्यक्रमांसाठी, न्यायालयीन कामासाठी, भरती प्रक्रियेसाठी व इतर प्रयोजनासाठी विभाग प्रमुख किंवा स्वीय सहायकांना दिलेल्या पैशांचा हिशेबच आलेला नाही. या प्रकरणी ज्यांना ज्यांना अँडव्हान्स म्हणून पैसे दिले होते, त्यांना दोन वर्षांपासून हिशेब सादर करण्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पालिकेतील अस्थिरतेचा फायदा घेत अनेकांनी पैसे भरण्याकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले होते. या प्रकरणी 8 नोव्हेंबर 2011 रोजी संबंधितांना लेखी नोटीस बजावून कारवाईचा बडगा दाखवूनही फरक पडला नव्हता. अखेर दोन वर्षांनंतर संबंधितांना रक्कमा जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांच्या पगारातून कपात करून वसुली सुरू झाल्याने पालिकेचे पैसे दाबून ठेवलेल्यांचे धाबे दणाणले आहे.