आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातून मौल्यवान वस्तू झाल्या गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेतील विविध विभागांमध्ये वेळोवेळी खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लांबवल्या आहेत. प्रशासनातर्फे मूल्यांकनाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यात सध्या उपलब्ध असलेल्या वस्तूंची माहिती घेतली जात आहे. यातून प्राप्त झालेली माहिती आणि गेल्या काही वर्षांत खरेदी झालेल्या विविध वस्तूंच्या याद्यांची पडताळणी करून गहाळ झालेल्या वस्तूंचा शोध घेतला जाणार आहे.

महापालिकेवर असलेले कर्ज आणि पालिकेची स्थावर व जंगम मालमत्ता किती आहे, याचे मूल्यांकन करण्याची प्रक्रयिा सध्या सुरू असून, त्याअंतर्गत लेखा विभागाकडून प्रत्येक विभागातील वस्तूंची यादी मागवण्यात आली आहे. 1 ते 27 मुद्दे असलेले माहितीपत्र भरून बहुतांश विभागांनी यादी सादर केली आहे. ज्या विभागांनी अद्यापही माहिती सादर केलेली नाही, त्यांच्याकडून ती मागवण्याचे कामही सुरू आहे. संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यावर पालिकेच्या भांडार विभागाकडे असलेल्या जडसंग्रह नोंदवही (डेड स्टॉक)तील नोंदींशी प्राप्त माहितीचा ताळमेळ बसवून पाहिला जाणार आहे. त्यात तफावत आढळून आल्यास माहिती सादर करणाऱ्यांकडून याबाबतचा खुलासा मागवला जाणार आहे. मूल्यांकनाच्या प्रक्रयिेतून पालिकेतील गहाळ झालेल्या वस्तूंचाही शोध घेतला जाणार आहे.
पालिकेच्या वस्तू गेल्या कुठे ?
पालिकेच्या शाळा व काही विभागांच्या दैनंदिन कामासाठी संगणक खरेदी करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काही संगणक जागेवर नाहीत. तसेच काही विभागांतील वातानुकूलित यंत्र व इतर साहित्य दुरुस्तीसाठी नेले होते; ते परत आणले गेले नाही. वाहन विभागासाठी वेळोवेळी नव्या बॅटरी खरेदी करण्यात येतात. त्यातही गौडबंगाल असल्याचा संशय असून, लेखापरीक्षणाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहितीनंतर याचाही शोध घेतला जाणार आहे. काही विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांकडून पालिकेच्या वस्तूंचा खासगी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले असून, त्यादृष्टीनेही तपास केला जाणार आहे.
मूल्यांकनात पडताळणी करू
पालिकेच्या विविध विभागांमध्ये असलेल्या विविध वस्तूंचे मूल्यांकन सुरू आहे. त्यानुसार कुठल्या कार्यालयात कोणत्या वस्तू आहेत? याची यादी मागवण्यात आली आहे. ही यादी प्राप्त झाल्यावर अकस्मात उलटतपासणी केली जाऊ शकते. तसेच जडसंग्रह नोंद वहीतील वस्तू-साहित्य खरेदी व प्राप्त यादीची पडताळणी करण्यात येईल. दोघांचा ताळमेळ न बसल्यास संबंधितांकडून खुलासा मागवला जाईल.
सुभाष भोर, मुख्य लेखापरीक्षक