आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत चार महापौर; राष्ट्रवादीचा नवा पायंडा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेतील सत्तेचे विभाजन करून सगळ्या घटकांना समान न्याय देण्याचा संकल्प राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. त्यासाठी महापालिकेत जळगाव पॅटर्नचा उपयोग करीत पाच वर्षांत चार महापौर, उपमहापौर तसेच पाच स्थायी व पाच आरोग्य सभापती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका महापौराला सव्वा वर्षांचा कार्यकाळ दिला जाणार आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून विकासाचा मार्ग धरला जाणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा नेते राजवर्धन कदमबांडे यांनी सांगितले.

महापालिकेत निर्विवाद बहुमत मिळवणार्‍या राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे या पक्षातर्फे महापौरासह विविध पदांवर कोणाला संधी दिली जाईल, याबाबत उत्सुकता असताना राष्ट्रवादीने शहराच्या विकासाचा नवा आराखडाच सोमवारी पत्रपरिषदेत मांडला. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडताना शहरवासीयांनी ज्या बहुमताने सत्ता दिली. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच यापुढे विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे.

शहरातील पाणी योजनेच्या नूतनीकरणासाठी केंद्र सरकारने 136 कोटी रुपयांच्या योजनेला यूआयडीएसएसएमटीमधून मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली व योजना मार्गी लावली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजना आहेत. मात्र, या योजनांच्या पाइपलाइन जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्यासाठी तसेच काही ठिकाणी जलकुंभ बांधण्यासाठी तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. त्यातून शहराला दररोज पाणी कसे देता येईल, हा प्रo्न सोडवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठाच नव्हे तर इतरही योजनांची कामे दर्जेदार कशी होतील, हे पाहिले जाईल. त्यासाठी स्वत: लक्ष घालणार असल्याचे कदमबांडे यांनी सांगितले. पूर्ण सत्ता हाती येणार असल्यामुळे कामांच्या दर्जाबाबत कोणतीही चालढकल किंवा निकृष्टपणा खपवून घेणार नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्याचसोबत ज्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, अशा काही अभ्यासू नागरिकांना महापालिकेत पदांवर पाठवण्यात येईल. त्याचबरोबर सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन कामकाज केले जाईल, असेही ते म्हणाले.

मनपात घोडेबाजार थांबणार
राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत मिळाल्याने यापूर्वी महापालिकेत होणारा घोडेबाजार आता थांबणार आहे. सत्तेसाठी यापूर्वी बर्‍याच कसरती कराव्या लागत होत्या. मात्र आता राजवर्धन कदमबांडे आठवड्यातून दोन तास महापालिकेतील सर्व विभागांचा आढावा घेतील. त्याचसोबत कामांमध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे सध्यातरी दिसत आहे.

थकबाकी वसुलीसाठी पॅटर्न
महापालिकेची नागरिकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी कशी वसूल करायची याचा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून या पद्धतीने थकबाकी वसूल केली. तशीच शहरातील नागरिकांकडून केली जाणार आहे. त्यासाठी पदाधिकार्‍यांना सूचना दिल्या जातील. त्याचे तंतोतंत पालन केले तर थकबाकी वसूल होणार आहे.