आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या भूमिकेबाबत प्रतीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय असेल, हे स्पष्ट होण्याची वाट पक्ष कार्यकर्ते आणि दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील कार्यकर्ते पाहता असले तरी त्यांना अजून आठवडाभर तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

राष्ट्रवादीबरोबर महाआघाडी करण्याचा प्रस्ताव भाजपसाठी खुला आहे, असे जाहीर करून भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच पक्षात खळबळ उडवून दिली आहे. अर्थात, त्या घोषणेनंतर पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. खडसे यांनी त्या वेळी ज्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांचे मंत्रिपदही त्यानंतर गेले. शिवाय, आमदार गिरीश महाजन यांनी अशी युती होऊ नये, असे मतही मध्यंतरी व्यक्त केल्यामुळे नेमके काय होणार आहे? याविषयी भाजपचे कार्यकर्ते आणि बहुतांश पदाधिकारीही संभ्रमात आहेत.

25 ते 30चा मुहूर्त
कार्यकर्त्यांना भूमिका जाणून घ्यायची कितीही उत्सुकता असली तरी त्यांची ही उत्सुकता आणखी आठवडाभर तरी ताणलेलीच राहाणार आहे. कारण 25 जून रोजी एकनाथ खडसे विदेशातून परत येतील. त्यानंतर 30 तारखेपर्यंत केव्हा तरी जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन पालिकेबाबतचे धोरण ठरवले जाणार आहे.

वेगवेगळे मतप्रवाह
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत होणार्‍या या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शहराध्यक्ष सुरेश भोळे, आमदार गिरीश महाजन, जिल्हा सरचिटणीस सुनील बढे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ आणि प्रदेश सहसंघटन मंत्री डॉ. राजेंद्र फडके हे उपस्थित राहातील, असे सांगण्यात आले. यात आमदार महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणे योग्य नसल्याचे आधीच म्हटले आहे तर अशी महायुती व्हावी यासाठी सुरेश भोळे आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर या कथित बैठकीच्या भूमिकेबाबत चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना उमेदवारांची प्राथमिक यादी तयार
शिवसेना महानगरची बैठक रविवारी दुपारी 12 वाजता शिवसेना कार्यालयात पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांची प्राथमिक यादी तयार केली. तथापि, याबाबत 30 जून रोजी जिल्हा बॅँकेच्या सभागृहात उपनेते गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख किशोर पाटील व चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. अंतिम उमेदवार निवडण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी ही यादी संपर्कप्रमुख विलास अवचट यांच्याकडे सादर करणार आहेत. दरम्यान, ही यादी त्यानंतर पक्षप्रमुखांकडे सादर केली जाईल, असे संपर्कप्रमुख अवचट यांनी सांगितले.

महापालिका निवडणूक न लढवण्याचा निर्धार
येत्या नोव्हेंबरपर्यंत कुठल्याही निवडणुका लढवण्याचा उद्देश नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतही उमेदवार देणार नसल्याचे ‘आम आदमी पार्टी‘तर्फे स्पष्ट करण्यात आले. तथापि, भ्रष्टाचाराने बरबटलेले जे उमेदवार निवडणुकीत उभे राहतील त्यांच्याविरुद्ध ‘आम आदमी’ प्रचार करेल, असे पार्टीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक संजीव साने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, घरकुल प्रकरणात अनेक विद्यमान नगरसेवकांवर आरोप असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध या निवडणुकीत ‘आम आदमी पार्टी’ नेमकी कोणती भूमिका बजावेल याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. ‘आम आदमी पार्टी’चे कार्य जिल्ह्यात सुरू झाले असून, त्याचा श्रीगणेशा रविवारी झाला. पार्टीच्या महाराष्ट्र सेक्रेटरी प्रीती शर्मा, जिल्हा निरीक्षक राहुल भारती उपस्थित होते. या वेळी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नऊ महिन्यांची बाकी
पालिकेतर्फे नगरसेवकांना नऊ महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. उत्पन्नाचे दुसरे साधने नसलेल्या नगरसेवकांना मानधनातून बरीच मदत होते. सार्वत्रिक निवडणुकीस तीन-चार महिने बाकी आहेत. या काळात सर्वांचेच खर्च वाढतात. त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच प्रशासनातर्फे नगरसेवकांना मानधन मिळायला हवे. प्रतिभा देशमुख, विरोधी पक्षनेत्या