आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वार्थाची पोळी भाजायला केला महापालिकेचा तवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महापलिका निवडणुकीत कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी आणि केव्हा ती बदलवावी, हा खरं तर त्यांचा अंतर्गत विषय आहे; पण तो विषय जेव्हा जनतेला मुर्ख बनवण्याकडे झुकायला लागतो त्यावेळी कोणी तरी बोलायची वेळ येते. सध्या ती वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणलेली दिसत आहे.

खान्देश विकास आघाडी आणि शहर विकास आघाडी यांनी एकत्र येऊन महापालिकेची निवडणूक लढवली आणि मागच्या तुलनेत (30+10) त्यांना 33 जागा मिळाल्या. पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अलिप्त राहून खान्देश विकास आघाडीला सत्तेवर येण्यासाठी मदत केली हे लपून राहिलेले नाही. नंतर झालेल्या महिला आणि बालकल्याण समितीच्या निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेसने उघड सत्ताधार्‍यांना साथ दिली. हे सारे का घडले, कशासाठी घडले? हेही लपून राहिलेले नाही. माजी मंत्री आमदार गुलाबराव देवकर यांनी त्या संदर्भातली पक्षाची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे सत्तेची कोणती गणितं मांडली जाताहेत आणि त्यांचे काय राजकीय परिणाम होणार आहेत, याचा अंदाज जळगावकरांना आला होता.

आता अचानक राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेत विरोधी भूमिका घ्यायला नेत्यांनी सांगितले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अशी भूमिका का घ्यायला सांगितली? जळगावकर जनतेचा कैवार आला म्हणून? मग सत्ताधार्‍यांना मदतीची होईल अशी भूमिका घेताना कुठे गेला होता हा कैवार? असा प्रश्न सहज निर्माण होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते नेते, स्थानिक की राज्य पातळीवरचे, या प्रश्नाचे उत्तर जळगावकरांना देणार आहेत हेही त्यांनी आता जाहीर करायला हवं.

खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, विशेषत: अजित पवार यांनी खरोखरच अशी सत्ताधार्‍यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सांगितले आहे की नाही? हा प्रश्नच आहे. तसे असते तर शुक्रवारीच झालेल्या सर्वसाधारण सभेत त्याचे प्रत्यंतर आले असते. ते आले नाही, याचा अर्थ विरोधात भूमिका घ्यायला सांगितली असे जे सांगताहेत ते तरी चुकीची माहिती देत असले पाहिजेत किंवा आपल्या पक्षाच्या शक्तिमान नेत्यालाही न जुमानण्याइतपत राष्ट्रवादीचे नगरसेवक मग्रुर झाले असले पाहिजेत. काय शक्य आहे, याचा अंदाज जळगावकर लावू शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यावी? हा त्यांचा विषय आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण त्यांच्या भूमिकेमुळेच सध्याचे सत्ताधारी स्थानापन्न झाले आहेत. त्यामुळे हा सत्ताषकट जनतेच्या कल्याणाच्याच दिशेने चालत राहील हे पाहाणे त्यांची पहिली नैतिक जबाबदारी आहे. एका नेत्याला त्याचे राजकीय भवितव्य दिसले म्हणून त्याने पाठिंबा दिला आणि दुसर्‍याला विरोध करण्यात आपल्या मोठे होण्याचा मार्ग दिसतोय म्हणून तो विरोध करायला लागला, अशी सध्याची परिस्थिती आहे. स्वार्थाच्या पोळय़ा भाजून घ्यायला महापालिकेचा तवा बनवावा, याला काय म्हणयचे?

दिल्लीत जे काही घडलं त्यापासून प्रस्थापित राजकीय पक्ष आणि राजकारणीही काही शिकायला तयार आहेत, असं दिसत नाही. सामान्य जनता संधीची वाट पाहात असते. अतिरेक झाला की तो करणार्‍यांना त्यांची जागा बरोबर दाखवते. त्यामुळे पाठिंबा आणि विरोधाचा स्वार्थी बालिशपणा नेते म्हणवणार्‍यांनी आता तरी सोडायला हवा.