आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन वर्षात मालमत्ता कर भरणार्‍यांना 2 टक्के दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिकेला या वर्षात मालमत्ता करापासून 60 कोटी रुपये उत्पन्न येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची रक्कम 31 डिसेंबरपर्यंत भरल्यास त्यांना 3 टक्के सूट देण्यात येणार आहे. नागरिकांना याचा फायदा होण्यासाठी सुटीच्या दिवसांनाही चारही प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारीनंतर कराचा भरणा करणार्‍यांना प्रती महिना 2 टक्के प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे.

महापालिका हद्दीत सुमारे 1 लाख मालमत्ता असून त्यापोटी 60 कोटी रुपये मालमत्ता कर येणे प्रशासनाला अपेक्षित आहे. 26 डिसेंबरपर्यंत मालमत्ता करातून प्रशासनाला एकूण 22 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 31 डिसेंबरपर्यंत कराचा भरणा करणार्‍या नागरिकांना 3 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर नियमानुसार 1 जानेवारीपासून मालमत्ता कराच्या रकमेवर 2 टक्के दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांना रिबीटचा फायदा मिळण्यासाठी चौथा शनिवार व रविवारच्या सुटीच्या दिवसातही प्रभाग कार्यालयात पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रभाग 4 मध्ये सर्वाधिक वसुली
पालिकेच्या प्रभाग एकमधून मालमत्ता कराची मागणी 21.77 कोटी असून आतापर्यंत 7.61 कोटी वसूल झाले आहेत. प्रभाग दोनची मागणी 12.61 कोटी तर वसुली 3.44 कोटी आहे. प्रभाग तीनची मागणी 13.68 कोटी असून 5.34 कोटी वसुली आहे. प्रभाग चारची उद्दीष्टे 10.62 कोटी असून आतापर्यंत 4.82 कोटी वसुली झाली आहे. चारही प्रभागातील वसुलीच्या टक्केवारीत प्रभाग चार आघाडीवर आहे.

लिपिकांना जप्तीचे अधिकार प्रदान
कराचा भरणा न केलेल्या मालमत्तांची जप्ती करण्याचे अधिकार 37 लिपिकांना प्रदान करण्यात आले आहेत. संबंधित लिपिकांसोबत असलेल्या पथकाकडून आपल्या अधिकाराचा वापर करून मालमत्ता सील करणे व जप्त करण्यात येऊ शकतात. आयुक्तांनी असे अधिकार संबंधितांना हस्तांतरित करता येतात.