आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेतील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेतील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, महत्त्वाची 13 पदे वगळता अन्य जागांसाठी सुमारे 12 हजार अर्ज आलेले आहेत. पात्र उमेदवारांची फेब्रुवारीत लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखतीच्या फंद्यात न पडता मेरीट लिस्टच्या आधारे थेट कर्मचा-यांची भरती करण्याचा विचार प्रशासन करीत आहे.
रिक्त पदांच्या भरतीसंदर्भातील स्थगिती न्यायालयाने उठविल्याने पुन्हा दुसरे विघ्न येण्यापूर्वी सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. डिसेंबर 2011मध्ये विद्युत विभागासाठी कनिष्ठ अभियंता, उपआवेक्षक, मॅकेनिकल, पंप ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, प्लंबर, ऑटो मॅकेनिकल आदी पदांसाठी मुलाखती झालेल्या आहेत. आता उर्वरित लिपिक, परिचारिका, वाहनचालक आदी रिक्त पदांसाठी मार्चपूर्वी भरतीप्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्राप्त अर्जांतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन वेळ वाया न घालवता गुणवत्ता यादीनुसार थेट भरती करण्यात येणार आहे.
उमेदवारांना दिलासा - ब-याच दिवसांपासून भरती प्रक्रीयेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या या आदेशामुळे दिलासा मिळाला असून आशा उंचावल्या आहे. त्यांचा नोकरीचा प्रश्न सुटणार आहे.
खासगी संस्थेकडून अर्ज छाननी - लिपिक, परिचारिका, वाहनचालक या पदांसाठी सुमारे 12 हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत. प्रतिअर्ज 55 रुपये याप्रमाणे या अर्जांच्या छाननीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. उमेदवाराची अर्हता व कागदपत्रे याची तपासणी करून पात्र उमेदवारांची यादी लावण्याचे काम संस्था करेल. एखाद्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेल्यास त्याची कारणे संबंधित संस्थेला द्यावी लागणार आहेत. हे काम महिनाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता - लेखी परीक्षेसाठी देण्यात येणारी प्रश्नपत्रिका अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. छपाई व सीलिंगची जबाबदारी खासगी कंपनीस देण्यात आली आहे. परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेसोबत दुहेरी उत्तरपत्रिका मिळणार असून, पेपर दिल्यावर उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी उमेदवाराला दिली जाणार आहे. प्रशासनाकडे असलेल्या उत्तरपत्रिकांची संगणकप्रणालीद्वारे तपासणी करण्यात येईल.
रिक्त असलेली पदे - महापालिकेत कनिष्ठ अभियंता-विद्युत, उपआवेक्षक, मॅकेनिकल लॅब टेक्निशियन, प्लंबर, ऑटो मॅकेनिकल प्रत्येकी एक तर पंप ऑपरेटर चार जागा. तसेच लिपिक, परिचारिका, वाहनचालक व अन्य अशी सुमारे 90 पदे रिक्त आहेत.