आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 दिवसांत 18 कोटी वसुलीचे मनपापुढे आव्हान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरपट्टी विभागातील अनागोंदी कारभाराने वरिष्ठ अधिका-यांची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकांकडून परस्पर तीन टक्के दंड वसुलीचा प्रकार प्रशासनाच्या अंगाशी आला आहे. ज्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात आली, आता त्यांच्या पुढील बिलात दंडाची रक्कम समायोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध उपाययोजना करूनही उद्दिष्ट पूर्ण होण्याचे चिन्हे दिसत नसून 75 दिवसात 18 कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे.
दरवर्षी घरपट्टी वसूल करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने उद्दिष्टपूर्ती होत नसल्याची ओरड दरवर्षी सभागृहात केली जाते. त्यामुळे प्रभावीपणे घरपट्टी वसूल वाढण्यासाठी शहराची चार प्रभागात विभागणी करण्यात आली आहे. मात्र, यानंतरही सुमारे 42 कोटींपैकी डिसेंबरअखेर 23 कोटी 42 लाख 53 हजार 745 कोटी रुपये वसुली झाली आहे. अद्यापही 18 कोटी रुपये कर वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. रिबीट मिळण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भरणा केल्याने ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे बाकी नागरिकांकडून वसुलीसाठी कर्मचा-यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.
अनेकांना लावला दंड - मागणी बिल न देताच तीन टक्के रिबीट देणे बंद केले. याउलट 31 डिसेंबरनंतर पैसे भरणा-यांकडून प्रभाग समिती एकच्या कर्मचा-यांनी तीन टक्के दंडासह घरपट्टी वसूल करण्यात आली. मात्र, दुस-या दिवशी कुठलाही दंड न आकारता घरपट्टी आकारण्यात आली. या प्रकारामुळे नागरिकांना आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात आल्यावर काही जणांच्या तक्रारी नंतर वरिष्ठांनी प्रकरण सावरासावर करत जादा घेतली गेलेली रक्कम समायोजित करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष - मिळकत धारकांच्या अर्जावरील नावात बदल, भाडेकरू निघून गेल्यावर अर्ज देऊनही नोंदी न बदलवणे, नळ संयोजन संदर्भातील तक्रारींची घरपट्टी विभागाकडून दखल घेतली जात नाही. वापर बंद होऊन यात बदल केले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
जप्ती मोहीम थंडावली - नागरिकांनी घरपट्टी भरण्यास महत्त्व द्यायला हवे, यासाठी थकबाकीदाराच्या घरासमोर वाजंत्री लावणे, घरातील वस्तूंची जप्ती आदी कारवाई करण्यात येत होती. भीतीपोटी वसुली वेग वाढत असे मात्र या उपाययोजना दुर्लक्षित झाल्या आहेत. सद्यस्थितीत शहरात चार रिक्षा करभरण्याचे आवाहन करत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
शिपाई, लिपिकांवर मदार - घरपट्टी वसुलीसाठी शिपाई व लिपिकांना कामाला लावून वरिष्ठ लिपिक, अधीक्षकांकडून मात्र खुर्च्या सांभाळण्याचे काम केले जात असल्याची ओरड होत आहे.
हा प्रकार फक्त एकाच विभागात - दंडासह वसुलीची तक्रार सर्वच ठिकाणी नाही. फक्त प्रभाग समिती एकमध्ये नागरिकांकडून तीन टक्के दंडासह घरपट्टी घेतली गेली होती. मात्र, ही बाब लक्षात आली असून ज्यांनी दंडाची रक्कम भरली असेल त्यांना ती समायोजित करून देण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी आहे. मात्र, तरीही कामाची गती वाढविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. - भालचंद्र बेहरे, उपायुक्त, महापालिका
वृक्षतोडीच्या कारवाईला रविवारचा अडथळा - मेहरूण तलावाच्या काठी असलेल्या श्रीकृष्ण लॉनमध्ये वृक्षतोड झाल्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने घटनास्थळ गाठण्यासाठी जय्यत तयारी केली होती. मात्र, दुसरा शनिवार आणि त्यानंतर रविवार अशा लागून आलेल्या दोन सुटींमुळे महापालिका प्रशासनाला इच्छा असून देखील काहीही करता आले नाही. सुटीच्या दिवशी काम मुळीच करायचे नाही, ही परंपरा टिकवत पालिका कर्मचारी तिकडे फिरकलेच नाहीत. रविवार आला तसा सोमवारही येणारच हे नक्की माहीत असल्याने महापालिकेकडून वृक्षतोडीची पाहणी सोमवारच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधितांना वृक्षतोडीचे पुरावे नष्ट करण्यासाठी जाणिवपूर्वक वेळ दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. जबाबदार आणि वरिष्ठ अधिका-यांच्या चुप्पीने कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
श्रीकृष्ण लॉनच्या चौकशीबाबत चालढकल - श्रीकृष्ण लॉनमध्ये झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती मिळाली नसल्याचे कारण पुढे करत महापालिकेने चालढकल सुरू केली होती. वृक्षतोड झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार असल्याने महापालिका पर्यावरण विभागातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, सुट्टी असल्याने रविवारी घटनास्थळी कुणीच पोहचले नाही. दरम्यान, वरिष्ठ अधिका-यांकडून देखील पाहणीबाबत कोणत्याच सूचना देण्यात आल्या नसल्याने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी रविवारी वृक्षतोडीच्या ठिकाणी पोहचले नाहीत. दोन दिवसाचा अवधी मिळाल्याने संबंधितांकडून वृक्षतोडीचे पुरावे नष्ट करण्यात येतील. असा मनपाचा तपास सुरू होण्याआधीच संपविण्याचा प्रयत्न होत असल्याची स्थिती आहे. शहरात वृक्षतोडीची मालिका सुरू असतांना महापालिकेने अद्याप एकाही प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव वाढल्याने पालिका प्रशासनाने पोलिसांना पत्र पाठवून कारवाईचे घोंगडे पोलिसांवर झटकले आहे. मनपाला थेट कारवाईचे अधिकार असून देखील पोलिसांकडे बोट दाखविले जात आहे.
माजी नगराध्यक्षांच्या जामिनावर आज सुनवाणी - जळगावात नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासाने वेग पकडला आहे. पोलिसांची तपासाची तयारी पूर्ण झाली असून सोमवारी माजी नगराध्यक्षांच्या अटकपुर्व जामीनावर सुनावणी होणार आहे.
घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची फिर्याद महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शहर पोलिस ठाण्यात दिल्यावरून आजी माजी 90 नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात होता. या प्रकरणाचे 11 वे तपासाधिकारी अपर पोलिस अधीक्षक इशू संधू यांनी या गुन्ह्याच्या तपासाची फाइल उघडताच अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. जिल्हा न्यायालयाने चत्रभूज सोनवणे, लक्ष्मीकांत चौधरी आणि पुष्षा पाटील या तिघा माजी नगराध्यक्षांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी तपासाधिकारी या नात्याने संधू स्वत: न्यायालयात उभे राहून बाजू मांडणार आहेत. त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. संधू गेल्या तीन दिवसांपूर्वी मुंबई येथून परतले. मात्र, ते तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक कार्यालयात दिसलेले नाहीत त्यामुळे एकीकडे त्यांची बदलीची चर्चा सुरू असतांना गेल्या तीन दिवसांपासून संधू कार्यालयातच दिसलेले नसल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र, संधू यांनी एका गोपनीय स्थळी या प्रकरणाचा गोपनीय तपास सुरू केला आहे. सोमवारी औरंगाबाद खंडपीठात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.