आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation School Development Issue Dhule

विद्यार्थी नव्हे शेळ्यांची ‘शाळा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिका शाळांचा दर्जा खालावला असून, शाळांमध्ये विद्यार्थी टिकवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांची संख्या वाढत नसल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या शाळांच्या वर्गात आता शेळयांची (बकर्‍या) शाळा भरते. काही शाळांचे रेकॉर्डच वार्‍यावर पडले आहे.

काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या शाळेत (तेव्हाची नगरपालिका) प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना मोठय़ा प्रमाणावर धडपड करावी लागत असे. त्यानंतरही अनेकांना प्रवेश मिळत नसे. काही शाळांना ब्रिटिशकाळापासूनचा इतिहास आहे. या शाळांमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. बहुतांश शाळांनी शंभरी ओलांडली आहे. मात्र कालांतराने महापालिकेच्या शाळांसमोर खासगी शाळांनी आव्हान उभे केले. या आव्हानाला महापालिकेच्या शाळांना तोंड देता आले नाही. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याने शाळांची स्थिती फाटक्या पुस्तकासारखी झाली आहे. अनेक इमारतींची दुरवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी 65 शाळा होत्या. सद्य:स्थितीत पहिली ते सातवीच्या केवळ 23 शाळा सुरू आहेत. त्यात 11 मराठी आणि 12 उर्दूमाध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. त्यातही मराठीपेक्षा उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

बारापत्थर परिसरात महापालिकेची उर्दू माध्यमाची शाळा क्रमांक आठ आहे. या शाळेच्या छताची काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आल्याने स्थिती चांगली असली तरी वर्गाच्या भिंती आणि इमारतीचे बांधकाम हे साधारणत: शंभर वर्षांपूर्वीचे आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या शाळेतील वर्गांमध्ये बकर्‍यांचा मुक्त संचार असतो. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी ठेवण्यात आलेल्या तांदळावरही बकर्‍या अधूनमधून ताव मारत असल्याचे दिसून आले.

महापालिकेचे दुर्लक्ष
शाळा क्रमांक वीसमध्ये एका वर्गात छताचे प्लास्टर पडल्याची घटना काल बुधवारी घडली. या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना 2 फेब्रुवारीला पत्र दिले होते. त्यानंतरही शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनाचे शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. संदीप महाले, सभापती : मनपा शिक्षण मंडळ

शाळा क्रमांक सातचे केवळ अवशेष
देवपूर परिसरातील शाळा क्रमांक सातच्या इमारतीची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी इमारतीचा केवळ सांगाडा उभा आहे. काही वर्ग कधीच जमीनदोस्त झाले आहेत. या ठिकाणी सद्य:स्थितीत केवळ तीन ते चार वर्ग तग धरून आहेत. शाळेच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर कचरा साचला आहे. या शाळेत फक्त बालवाडीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते. या शाळेची पूर्वीची स्थिती उत्तम होती. तिन्ही बाजूने शाळेला वर्ग होते. वर्गात विद्यार्थीही होते. आता येथे अतिक्रमण झाले आहे.

रेकॉर्ड वार्‍यावर
देवपुरातील शाळा क्रमांक सात पावसाळयात गळते. या शाळेचे महत्त्वाचे रेकॉर्ड उघड्यावर पडले आहे. ही कागदपत्रे धुळीने पूर्णपणे माखली असून, रेकॉर्डची दुरवस्था झाली आहे. शाळा प्रशासनाला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नसल्याची स्थिती आहे. या महत्त्वपूर्ण ठरणार्‍या कागदपत्रांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज आहे. मात्र त्याची दखलही घेण्यात आलेली नाही.

दुर्गंधीत बसावे लागते वर्गात
मौलवीगंज भागातील शाळा क्रमांक 43ची इमारत जुनी आहे. या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या शाळेचे छत लाकडी आहे. त्याचा काही भाग कमकुवत झालेला आहे. काही पत्रे उडाली आहेत. शाळेच्या मागील बाजूस मोठय़ा प्रमाणावर कचरा साचला आहे. त्यामुळे शाळेत दुर्गंधी येते. तशाच स्थितीत विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शाळा क्रमांक वीसची दुरवस्था
शाळा क्रमांक वीसचीही दुरवस्था झाली आहे. या शाळेची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनतर्फे गुरुवारी महापालिकेचे उपायुक्त हनुमंत कौठळकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी फकरुद्दीन लोहार, आरिफ पठाण, शरीफ शेख, गुलाब कादीर अन्सारी, जमील युसूफ शाह, हाशिम सय्यद, इमरान शेख, रईस शेख, शफिक शेख आदी उपस्थित होते.