आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या शाळेत विद्यार्थिनींची होतेय कुचंबणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे असंख्य योजना राबविल्या जात आहेत. परंतु शालेय स्तरावर पावलोपावली विद्यार्थिनींची कुचंबणा होत असताना दिसते. सक्षम आणि उज्‍जवल पिढी घडवण्याची नुसतीच वल्गना केली जात असून शाळेत विद्यार्थिनींना आणि शिक्षिकांना पुरेशा स्वच्छतागृहाची सुविधाही उपलब्ध करून दिलेली नाही.

महापालिकेच्या 19 इमारतींमध्ये दोन सत्रात 43 शाळा भरतात. सुविधांच्या बाबतीत 19 इमारतींपैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. पालिकेच्या शाळेत एकूण 4 हजार 762 विद्यार्थिनी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी 64 शौचालय आहेत. मात्र 50 टक्केपेक्षा अधिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे मुलींच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असून अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जात आहेत. स्वच्छतागृहांमुळे मुलींच्या आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. ‘दिव्य मराठी’ ने केलेल्या पाहणीमध्ये काही शाळांमध्ये स्वच्छतागृहांना कुचकामी दरवाजे, गळके छत, पुरेसे पाणी उपलब्ध नसणे, निर्जंतुकीकरणाचा अभाव याबाबींकडे सर्रास दुर्लक्ष झाले आहे. असोदा रोडवरील पालिकेच्या स्वातंत्र्य सैनिक सोनीबाई दायमा, पालिका शाळा क्रमांक 14 मध्ये 116 मुली व 3 शिक्षिका आहेत.

तीन मजली असलेल्या या शाळेत प्रत्येक मजल्यावर एक या प्रमाणे केवळ तीनच शौचालय असून त्याचा वापर शौचालय व मुतार्‍या म्हणून केला जात असल्याचे ‘दिव्य मराठी’ ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. शाळेलगत बाजार भरत असल्याने खालच्या मजल्यावरील शौचालयाचा वापर बर्‍याचदा बाहेरची मंडळी येऊन करून जात असल्याची व्यथा शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती भंगाळे यांनी मांडली. या शाळेचे आपण प्रातिनिधिक उदाहरण घेतले. परंतु मनपाच्या 50 टक्के पेक्षा अधिक शाळांची अशीच परिस्थिती आहे. शाळांमधील शौचालय व स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच नियमित साफसफाईसाठी नेहमीच पाठपुरावा करीत असल्याचे शिक्षण मंडळ सदस्य हरीश आटोळे यांनी सांगितले. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सर्व शाळेत अद्यावत असे स्वच्छतागृह असावे असा नियम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 120 मुलांमागे 1 शौचालय व 3 स्वच्छता गृहे असावीत असा निकष ठरवून दिला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी शहरातील सर्व शाळांची तपासणीही करण्यात आली होती.