आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकाच असुरक्षित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरवासीयांची आपत्कालीन परिस्थितीत दक्षता घेणारी महापालिका स्वत: आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करायला सक्षम नाही. प्रशासकीय इमारत निर्मितीपासून बसवलेली यंत्रणेची कार्यक्षमता पडताळणी झालेली नसून आग लागल्यास कोलकाता येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती महापालिकेत होण्याची शक्यता आहे. असे असतानाही प्रशासन याकडे झोळेझाक करीत आहे. यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीवर कागदोपत्री पालिकेने लाखो रुपये खर्च केलेला आहे.
शहरात एखादी दुर्घटना घडल्यास महापालिकेच्या अग्निशमन दलास पाचरण करून मदतकार्य करत नागरिकांचे प्राण वाचविले जातात. यासाठी पालिकेच्या ताफ्यात तीन नवे व दोन जुने असे दोन असे पाच अग्निशमन बंब आहेत. मात्र, जळगावकरांची काळजी घेणा-या जळगाव महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी आणि येथे येणारे नागरिकही सुरक्षिततेचा दावा करू शकत नाही. महापालिकेची इमारत उभारणी करताना कुठल्याही मजल्यावर आगीसारखी दुर्घटना घडल्यास तत्काळ उपाययोजना करता यावी म्हणून प्रत्येक मजल्यावर सतराव्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, 10 वर्षांत एकदाही या यंत्रणेची पडताळणी करण्यात आलेली नसल्याने ती चालू शकते किंवा नाही याची शास्वती कुणीही देऊ शकत नाही. ती यंत्रणा न चालल्यास दुसरी पर्यायी व्यवस्था म्हणून वापरण्यात येणारी अग्निशमन हंड्या (एस्ंिटग्युशर)देखील नाहीत. स्थापनेपासून अद्याप एकदाही दुर्घटना घडलेली नसली तरी महत्त्वपूर्ण यंत्रणेबाबत हलगर्जीपणा नागरिकच नव्हे तर कर्मचारी व अधिका-यांच्याही जीवावर बेतू शकतो.
कुठल्याही क्षणी यंत्रणेची रंगीत तालीम - महापालिकेत असलेल्या अग्निशमन यंत्रणेची देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका लाखो रुपये खर्च करते तर त्याची उपयुक्तताही तपासायला हवी. पुढील काळात अचानक कोणत्याही क्षणी कुठल्याही विभागाची रंगीत तालीम (मॉप ड्रील) घेणार आहे. त्यावेळी पालिकेची कोणती यंत्रणा किती सक्षम आहे, हे आपोआप निदर्शनास येईल. - प्रकाश बोखड, आयुक्त, महापालिका
मेंटेनन्ससाठी लाखोंचा खर्च - अनुचित घटना घडल्यास आपण सक्षम असले पाहिजे म्हणून प्रशासनातर्फे 20 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच जळगावातील त्रिवेणी एन्टरप्रायजेस नामक मक्तेदाराने याचे काम करून वस्तू पुरविल्याचे दाखविले आहे, प्रत्यक्षात मोजक्याच मजल्यांवर पाइपलाइन व अन्य आवश्यक वस्तू दिसून येतात. दुरुस्तीनंतर त्याची पडताळणी न करताच काही कर्मचा-यांच्या मदतीने यंत्रणेची ना हरकत प्रमाणपत्र देऊन बिलातील बरीचशी रक्कम उकाळण्यात आली आहे.
वस्तूची झाली चोरी - प्रत्येक मजल्यावर अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, डिलेव्हरी होज (मोठा कापळी पाइप) लाल पेट्यांमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, कित्येक मजल्यावरील पाइप चोरीस गेले आहेत. त्या पाइपाच्या पुढे ब्रॅँच (पितळी नोझल) असते त्याचीही चोरी झाली आहे. महापालिकेत मेटल डिटेक्टर सुरक्षा यंत्रणा व सुरक्षा कर्मचारी तैनात असताना ही चोरी झाली कशी? हा संशोधनाचा विषय आहे.
अशी आहे यंत्रणा - अग्निशमन दलाच्या एका बंबाची क्षमता सहा हजार लिटर असते. मात्र, महापालिकेच्या सतराव्या मजल्यावर असलेली मोठ्या पाण्याच्या टाकीची क्षमता 50 हजार असून त्याद्वारे मेन होज तळमजल्यापर्यंत आहे. त्यावरून प्रत्येक मजल्यावर होजरील होल (छोटी पाइपलाइन रिळ) व दोन डिलेव्हरी होज (मोठी कापडी पाइपलाइन) अशी व्यवस्था केली आहे. आग लागल्यास सायरन वाजून कर्मचारी सतर्क करण्यासाठी प्रत्येक मजल्यावर छोट्या काचेच्या बॉक्समध्ये इमर्जन्सी बेल आहे. आगीचे स्वरुप पाहून लहान किंवा मोठ्या पाइपाचा उपयोग करून आग नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेची उभारणी करण्यात आली होती.