आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची आर्थिक स्थिती वसुलीनंतर सुधारेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - उत्पन्न कमी अन‌् खर्च अधिक असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय विदारक झाली आहे. महापालिकेचे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत ४० कोटींनी कमी आहे. या स्थितीतून महापालिकेला बाहेर काढण्यासाठी वसुलीवर भर दिला जाणार असून, नागरिकांनी कर भरून सहकार्य केल्यास दोन महिन्यांत परिस्थिती बदलू शकते, अशी माहिती आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेच्या आयुक्तपदी तीन आठवड्यांपूर्वी डॉ.नामदेव भोसले यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच महापालिकेच्या स्थितीविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, वृक्षारोपण, स्वच्छता, पाणीपुरवठा, मालमत्ता करवसुली, कर्मचारी शिस्त या पाच मुद्द्यांवर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरातील रस्ते गटारींची नियमित स्वच्छता करण्याची सूचना संबंधित कर्मचार्‍यांना केली असून, शहरातील सर्व भागात फिरून समस्या समजून घेत आहे. महापालिकेत स्वच्छता कर्मचार्‍यांची कमरता असली तरी, उपलब्ध कर्मचारी चांगले काम करत आहेत. महापालिकेच्या हद्दीत वृक्षारोपणावर भर दिला जाणार असून, चार हजार राेपे लावली जातील. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येईल. तसेच लोकसहभागातून नाल्यांची स्वच्छता करण्यात येऊन नाल्यांकाठी वृक्षांची राेपे लावली जातील.
पाणीपुरवठ्याची स्थिती बिकट असून, अनेकांनी मुख्य जलवाहिनीवरून अवैध नळ जोडण्या घेतल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५० ते ६० अवैध नळ जाेडण्या बंद केल्या असून, ही मोहीम वेगात राबवण्यात येईल. पाणीपुरवठ्याच्या नियोजनात अनेक त्रुटी असून, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे. महिन्याला १२ ते १३ कोटी रुपयांचा खर्च असून, उत्पन्न फक्त तीन कोटी रुपये आहे. तसेच कर्मचार्‍यांचे मार्च एप्रिल महिन्याचे वेतनही रखडले आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वसुली मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरल्यास स्थिती सुधारेल.

तीन महिन्यांनी पाणीपट्टी बिले
शहरातअनेकांनी महापालिकेची परवानगी घेता नळ कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे अवैध नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. परिणामी, पाणीपट्टीत वाढ होईल. तसेच महापालिकेकडून आगामी काळात दर तीन महिन्यांनी पाणीपट्टीची बिले देण्यात येणार आहेत. त्यामुळे वसुली वेगात होण्यास मदत होईल, अशी माहिती आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांनी दिली.

अतिक्रमण काढणार...
डॉ. भाेसलेयांनी सांगितले की, शहरातील डीपी रस्त्यावरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असून, त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मोकळ्या जागांवरील, त्यानंतर शासकीय जागा खासगी जागांवरील अतिक्रमण काढण्यात येईल.

अनावश्यक हायमास्ट बंद
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून, तीन महिन्यांचे वीजबिल थकले आहे. शहरात अनेक भागात गरज नसताना हायमास्ट सोडियम व्हेपर दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते बंद करण्यात येतील. तसेच दिवसा पथदिवे सुरू राहणार नाही याचीही दक्षता येण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...