आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचे ट्रॅफिक ‘वॉर्डन’ होणार हद्दपार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाहतूक नियंत्रण शाखेच्या मदतीसाठी 10 वर्षांपूर्वी महापालिकेने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले होते. पालिका अधिनियमात या संदर्भात तरतूद नसतानाही सुरू असलेला खर्च कपातीच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांनंतर चौकाचौकात पांढर्‍या (पूर्वी आकाशी) गणवेशात दिसणारे ट्रॅफिक वॉर्डन हद्दपार होणार आहेत.

पालिकेतर्फे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कारकिर्दीत 2003 मध्ये शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. 10 वर्षांपासून पोलिसांच्या मदतीला शहरात पांढर्‍या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट अशा गणवेशात चौकाचौकात ट्रॅफिक वॉर्डन दिसून येतात. सद्या प्रति वॉर्डनला पालिकेतर्फे दरमहा तीन हजार रुपये मानधन दिले जाते. ट्रॅफिक वॉर्डनची संख्या सद्या 15 असून दरमहिन्याला 45 हजार तर वर्षाकाठी 5 लाख 40 हजार रुपये खर्च केला जातो. नागरिकांच्या पैशांतून करावयाच्या कामासंदर्भात पालिका अधिनियमात ट्रॅफिक वॉर्डनची तरतूद आहे काय, याचा शोध घेण्यात येत आहे. अधिनियमात तरतूद सापडत नसल्याने दरवर्षी एवढा मोठा खर्च करावा का नाही? या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या हालचाली सुरूझाल्या आहेत.

..तर कर्मचार्‍यांचा पर्याय खुला
पोलिसांना खरोखर मदतीची आवश्यकता असल्याचा विषय समोर आल्यास पालिकेत अतिरिक्त ठरणार्‍या कर्मचार्‍यांकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. अतिरिक्त कर्मचार्‍यांची माहिती, संकलित करण्याचे काम आस्थापना विभागातर्फे सुरू आहे. टप्प्याटप्प्याने अतिरिक्त ठरणार्‍या कर्मचार्‍यांकडे पालिकेचा खर्च होत असलेल्या योजनांमध्ये उपयोग करून घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. सुरक्षारक्षकांवर होणारा अनावश्यक खर्चही या निमित्ताने कमी करण्याचे सूतोवात आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत.

महासभेसमोर येणार विषय
पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त ट्रॅफिक वॉर्डनची सेवा यापुढे कायम ठेवण्यात येऊ नये, असे मत अधिकार्‍यांचे आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या महासभेसमोर हा विषय ठेवण्यात येणार आहे. सभागृहाने शिक्कामोर्तब केल्यास यावर होणारा खर्च बंद होऊ शकतो.